२३ तारखेला आपली भूमिका मांडणार राणे


मुंबई – ओरस येथील मेळाव्यात काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोणती भूमिका मांडणार याची उत्सुकता असतानाच आपल्याबद्दलचे गुढ २३ एप्रिलपर्यंत कायम ठेवले आहे. पण राणे यांनी मेळाव्यात काही तालुक्यांचे अध्यक्ष तसेच निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली असली तरी प्रदेश काँग्रेसने अशा कोणत्याही नियुक्त्यांना मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राणे यांनी एक प्रकारे काँग्रेस नेत्यांना आव्हानच दिले आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जातानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यापासून राणे यांच्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. राणे यांनी शहा यांची भेट घेतली नसल्याचा दावा केला असला तरी राणे हे फार काळ काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत हे काँग्रेस नेत्यांचे मत झाले आहे. राणे यांनी या पार्श्वभूमीवर ओरसमध्ये जिल्हा काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत राणे काय बोलणार याची प्रचंड उत्सुकता होती.

राणे यांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत चार तालुका अध्यक्षांची तसेच निरीक्षकांची नवीन नावे जाहीर केली. राणे यांनी वैभववाडी (अरविंद रावराणे), कुडाळ (रणजित देसाई), दोडामार्ग (रमेश दळवी), देवगड (डॉ. अमोल तेली) यांची तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली. तसेच लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि तालुकानिहाय अध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली. नव्या नियुक्त्या राणे यांनी केल्या असल्या तरी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण किंवा अन्य कोणत्याही नेत्यांशी त्यांनी याबाबत चर्चा केलेली नाही. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. राणे यांनी काँग्रेस नेत्यांच्या संमतीशिवाय स्वत:हूनच तालुका अध्यक्ष व निरीक्षकांची नावे जाहीर करीत सर्व महत्त्वाच्या पदांवर आपल्या समर्थकांची वर्णी लावली.

राणे यांनी भविष्यातील आपल्या राजकीय वाटचालीबद्दल कोणतेही मतप्रदर्शन केले नसले तरी २३ तारखेला पडते येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राणे बहुधा भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.