चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार की नाही?


मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये एक जूनपासून सुरुवात होणार असून भारताची पहिला सामना आयसीसीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानबरोबर ४ जूनला आहे. पण या स्पर्धेमध्ये भारताच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बीसीसीआयला देण्यात येणारा महसुलातील हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आयसीसी असल्यामुळे बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा आहे. आयसीसीच्या या निर्णयाला कठोर विरोध करण्याची भूमिका बीसीसीआयच्या दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयसीसीकडून भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना महसुलातील सर्वाधिक हिस्सा मिळतो. तसेच या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाला कोणताही निर्णय घेताना महत्त्व दिले जाते. जर या निर्णयात आयसीसीने बदल केला तर या तिन्ही बोर्डांचे पंख कापले जाणार असल्यामुळे बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे.