१० लाखाच्या इनामावरून मौलवीच्या शब्दात बदल…


मुंबई – एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने सडेतोड उत्तर दिले. मात्र यानंतर सोनू निगमचं मुंडण करणा-याला १० लाखांचे बक्षीस जाहीर करणारे पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी पलटी मारली आहे. सोनू निगमने सर्व अटींची पुर्तता केली नसल्याने आपण त्याला १० लाख रुपये देणार नसल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

१७ एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्विट सोनू निगमने केल्यानंतर सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी जाहीर केले होते. आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस सोनू निगमने कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले. त्यावर कादरी यांनी उत्तर दिले असून, सोनू निगमला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे. मी तीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये सोनू निगमला चपलांचा हार घालून देशातील प्रत्येक घरात घेऊन जावे असेही म्हटले होते. त्यानंतरच मी १० लाख रुपये देईन, असे सय्यद कादरी बोलले आहेत.