नवी दिल्ली – एएससीआयने (अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया) अॅपल, कोका कोला इंडिया, भारती एअरटेलसहित अनेक आघाडीच्या कंपन्यांनी जाहिरातीतून दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. अशा १४३ जाहिरातींवरील आक्षेप योग्य असल्याचे सांगत जाहिरात क्षेत्रातील नियामक संस्था असलेल्या एएससीआयने या कंपन्यांना फटकारले आहे.
अॅपल, एअरटेलसह १४३ कंपन्यांना एएससीआयने झापले
एएससीआयने अॅपलच्या आयफोन-७ प्लस व्हॅरियंट जाहिरातीसह विविध १४३ कंपन्यांच्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवला आहे. जानेवारी महिन्यात मोबिक्विक, एचयूएल, अमूल, ओपेरा, स्टँडर्ड चार्टड बँक आदीसंह विविध कंपन्यांच्या जाहिरातींबाबत १९१ तक्रारी एएससीआयच्या ग्राहक तकार परिषदेकडे (सीसीसी) आल्या होत्या. एएससीआयकडे आलेल्या तक्रारींमध्ये आरोग्य क्षेत्रातील १०२, शिक्षण क्षेत्रातील २०, व्यक्तिगत देखभालीच्या ७, पेय पदार्थ क्षेत्रातील ६ आणि इतर श्रेणीतील ८ जाहिरांतीवर तक्रारी आल्या होत्या.
एएससीआयनुसार, आपल्या आयफोन ७ साठीच्या जाहिरातीत अॅपल इंडियाने चुकीचा फोटो वापरला आहे. अॅपलने अद्याप याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. शीतपेय कंपनी कोकाकोला इंडियाच्या थम्स अपच्या जाहिरातीवरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या कंपन्यांनी दुचाकीस्वाराला रस्त्यावर लोकांसमक्ष कसरती करताना दाखवले आहे. ही जाहिरात धोकादायक कसरती करण्यास प्रोत्साहन देते, असे एएससीआयने म्हटले आहे. याबाबत कोकाकोला इंडियाच्या प्रवक्त्याने एएसआयच्या सुचनेनुसार जाहिरातीत बदल केले असून नवीन जाहिरात प्रसारितही केल्याचे सांगितले.