शशिकला यांची गच्छंती


जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री होऊन राज्यात जयललितासारखेच स्थान मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या अद्रमुकच्या नेत्या शशिकला यांना त्यांच्याच अनुयायांनी पक्षातून काढून टाकले आहे. त्यांच्याकडे असलेली पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून त्यांचा पुतण्या दिनकरण यालाही सहाय्यक महासचिवपदावरून काढून टाकण्यात आले आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर शशिकला यांनी अतीशय तत्परतेने पक्षावर आपली पकड बसवली होती. ती आता पूर्णपणे संपली आहे. त्यांची इच्छा मुख्यमंत्री होण्याची होती. परंतु त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल याचवेळी लागला आणि शशिकला यांना चार वर्षाची शिक्षा झाली.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न सर्वोच्च न्यायालयाने हिरावून घेतले. पण तरीसुध्दा पक्षावरचे आपले वर्चस्व कमी होऊ नये याची दक्षता घेत त्यांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री केले. ज्यावेळी पलानीस्वामी यांचा शपथविधी झाला त्याचवेळी लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते आणि पलानीस्वामी हा माणूस मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचा नाही असे स्पष्ट केले होते. मात्र शशिकला पक्षावर वर्चस्व ठेवण्यासाठी जे प्रयत्न करत होत्या त्यांचा विचार केला असता पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री होण्यास अपात्र असणे हीच शशिकला यांच्यादृष्टीने त्यांची पात्रता होती.

कारण शशिकला यांना कारागृहात बसून राज्य चालवायचे होते आणि त्यासाठी पलानीस्वामी यांच्यासारखा होयबा मुख्यमंत्री हवा होता. असा मुख्यमंत्री सत्तेवर बसून आपला पुतण्या दिनकरण यांच्या साह्याने त्यांना तामिळनाडूवर राज्य करायचे होते. परंतु त्यांच्या दुर्दैवाने पलानीस्वामी हा कसा गुळाचा गणपती आहे हे सर्वांच्या लक्षात यायला लागले. शिवाय शशिकलांचा पुतण्या दिनकरण याच्या भ्रष्टाचारी कारवाया सुरूच राहिल्या. गेल्या आठवड्यात तर त्याला निवडणूक आयुक्तांनासुध्दा लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. अशा रितीने अण्णा द्रमुकच्या सत्ताधारी गटाने या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबाचा प्रभाव आहे हे दिसायला लागले. त्यामुळे सत्ताधारी गटाला संकोच वाटायला लागला. शिवाय दोन्ही गटांचा विचार केला तरी अण्णा द्रमुकचा खरा वारसा पुढे चालवण्याची क्षमता केवळ पनीरसेल्वम यांच्यातच आहे. हीही गोष्ट त्यांच्या विरोधी पलानीस्वामी गटाला लक्षात यायला लागली. म्हणून या दोन गटांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू केली. तिचाच एक भाग म्हणून शशिकला यांची उचलबांगडी झाली आहे.

Leave a Comment