वाघेला पुन्हा मैदानात


गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे ढोल वाजायला लागले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून अगदी अपवादात्मक प्रसंगी गुजरातमध्ये आलेले नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरातमध्ये थांबले. सुरतमध्ये त्यांनी रोड शो केला. तो एवढा प्रचंड केला की कॉंग्रेसच्या नेत्यांना तेवढा मोठा रोड शो करण्याची कल्पनासुध्दा करता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्वसुध्दा नाही. कॉंग्रेसचे लोकही सुरतच्या रोड शोमुळे सावध झाले असून त्यांनी विधानसभा निवडणुकीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यायी नेता अस्तित्वात असला तरी माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करून उभे करण्याची तयारी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरू केली आहे.

गेल्या २५ वर्षांपासून कॉंग्रेसला गुजरातेतील सत्ता मिळवता आलेली नाही. परंतु आता मात्र ती मिळवायचीच असा त्यांचा निर्धार आहे. भाजपाला यावेळी सत्ता मिळवता येणार नाही असा कॉंगे्रेसच्या नेत्यांचा अंदाज आहे. २५ वर्षांतील कारभारातून तयार झालेली प्रस्थापित विरोधी भावना, पटेल समाजाचे आंदोलन आणि अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळी यामुळे भाजपाला यावेळी सत्ता प्राप्त करणे अशक्य होऊन बसेल असा विश्‍वास आता गुजरातमधील कॉंग्रेसची धोरणे ठरवणार्‍या प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. म्हणजे प्रशांत किशोर हेच गुजरातेतसुध्दा कॉंग्रेसचे सल्लागार आहेत. त्यांच्या धोरणांमुळेच पक्षाला पंजाबमध्ये यश मिळालेले आहे आणि गुजरातेतही मिळेल अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना लागून राहिलेली आहे.

यावेळी भाजपाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी उपलब्ध नाहीत. त्याचाही फायदा कॉंग्रेसला होईल मात्र त्यासाठी शंकरसिंह वाघेला यांच्यासारखा नेता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असला पाहिजे. वाघेला यांना राज्याच्या सर्व भागातील लोक चांगलेच ओळखतात. शिवाय त्यांनी एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून (भाजपाचे) कामही केलेले आहे. ते अनुभवी आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी खुद्द शंकरसिंह वाघेला यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होण्यास मान्यता दिलेली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवरच्या इतिहासात गुजरातमध्ये कॉंग्रेसने कधीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुळातच असा उमेदवार जाहीर करण्याच्या विरोधात असलेले कॉंग्र्रेसचे नेते वाघेला यांच्या नावाला तरी कितपत मान्यता देतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment