ओरिसाची राजधानी भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. याच शहरात अतिविशाल असे लिंगराज मंदिर असून येथे शिव व विष्णू म्हणजे हरी व हर एकाच ठिकाणी विराजमान आहेत. १ हजार वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नुकतीच या मंदिराला भेट देऊन तेथे पूजा केली. भाजप कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी मोदी येथे उपस्थित होते.
भुवनेश्वरमधील अतिविशाल लिंगराज मंदिर
या मंदिराची कथा अशी सांगतात की लिट्टी व वसा नावाच्या दोन राक्षसांना युद्ध करून देवी पार्वतीने येथे ठार केले. युद्धानंतर तिला तहान लागली होती म्हणून ती भागविण्यासाठी महादेवांनी येथे विहीर बनविली. या विहीरीत येण्याचे आवाहन सर्व नद्यांना केले गेले. त्यामुळे येथे भारतातील सर्व पवित्र नद्या आहेत असे मानले जाते. बिंदुसागर सरोवराजवळ हे मंदिर असून ११ व्या शतकातील सोमवंशी राजा ययाती केसरी याने या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.
मंदिराचे शिखर १८० फूट उंचीचे आहे व प्रांगणाचा परिसर १५० चौरस मीटरचा आहे. कळसाची उंची आहे ४० फूट. देवळाच्या प्रांगणात ६४ छोटी मंदिरे आहेत. पूर्वी या मंदिरांची संख्या १०८ होती. येथे येणार्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे.