Skip links

खासदार रवींद्र गायकवाडांचा पुन्हा राडा


लातूर : उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर आता त्यांचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एकीकडे लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला.

रवींद्र गायकवाड स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे आक्रमक होऊन आंदोलन करू लागले. एसबीआयच्या बँक अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र शिवसैनिक आक्रमक होऊन बँक अधिकाऱ्यांना धक्का-बुक्की करू लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलिसांशीच हुज्जत घालीत दबंगगिरी सुरु केली.

पोलिसांना अरेरावीची भाषा करीत गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सत्यवान हाके यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही त्यांनी पोलिसांना दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.