राष्ट्रवादी अजेंडा


अजेंडा म्हणजे विषयपत्रिका. भारतीय जनता पार्टीची एक विशिष्ट विषयपत्रिका आहे. हा पक्ष हिंदुत्ववाद मानणारा असल्यामुळे त्याच्या विषयपत्रिकेवरील काही विषय हे हिंदुत्वाशी निगडित आहेत. किंबहुना ते खास हिंदुत्ववादी विषय आहेत. परंतु भाजपा आणि संघ परिवाराच्या मते जे विषय हिंदुत्वाशी निगडित आहेत तेच विषय राष्ट्रवादाशी निगडित आहेत. अशा रितीने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा संघ परिवाराचा अट्टाहास आहे. परंतु या निमित्ताने पुढे आलेले विषय किंवा हिंदुत्ववादी अजेंड्यावरील विषय हे सरसकट राष्ट्रीयत्वाशी निगडित आहेतच असे नाही. मात्र एक गोष्ट निश्‍चित आहे की या प्रत्येक विषयाशी मुस्लीम समाज जोडला गेलेला आहे आणि या मुद्यांवर संघ परिवार विरुध्द मुस्लीम, जनता असे द्वंद्व उभे राहिलेले दिसत आहे. नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदुत्ववादी मानले जाणारे पंतप्रधान असूनही ते पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यातला कोणताही विषय पुढे येऊ दिला नव्हता आणि आपले सारे लक्ष त्यांनी विकास या एका विषयावर केंद्रीत केलेले होते.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र या वातावरणात मोठा फरक पडला आहे. योगींनी सत्ता हातात घेतल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांतच या अजेंड्यावरच्या कत्तलखाने हा विषय हाती घेतला. राज्यात असलेल्या अनेक बेकायदा कत्तलखान्यांवर त्यांनी बंदी आणली. खरे म्हणजे हा विषय मुस्लीम विरुध्द हिंदू असा नाही. आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचे सगळे कत्तलखाने बंद केले असे नाही. तर बेकायदा कत्तलखाने बंद केले. मात्र या व्यवसायामध्ये बहुसंख्येने मुस्लीम समाज असल्यामुळे या कारवाईला मुस्लीमविरोधी कारवाईचे रुप देणे काही लोकांसाठी सोयीचे झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये देशातल्या मुस्लीम समाजाला एकाकी पाडण्याची भावना असते. ते थेट तसे काही करत नाहीत. परंतु छुपेपणाने त्यांचे तसे प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे त्यांच्या काही कारवाया मुस्लीम विरोधी नसल्यातरी त्यांना तसे रुप आपोआपच येते. शिवाय समाजवादी पार्टी, कॉंग्रेस या पक्षाच्या लोकांना भारतीय जनता पार्टी आणि मुस्लीम समाज एक होता कामा नये असे वाटत असते. त्यामुळे भाजपाची एखादी कारवाई मुस्लीम विरोधी नसली तरी तिला हेच लोक मुस्लीम विरोधी ठरवून मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. बेकायदा कत्तलखान्यांच्या बाबतीत असेच घडले. मात्र या अजेंड्यावरचे सगळे विषय अशाच प्रकारचे आहेत असे नाही.

सध्या पुढे आलेल्या विषयांमधील सगळेच विषय भाजपाने पुढे आणलेले नाहीत. काही विषय न्यायालयातल्या सुनावणीतून पुढे आलेले आहेत. वंदे मातरम्चा विषय असाच पुन्हा एकदा पुढे आला. गेल्या १०० वर्षांपासून हा विषय चर्चिला जात आहे. परंतु हा विषय विनाकारण हिंदू विरुध्द मुस्लीम झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील अश्‍विनी उपाध्याय यांनी एक याचिका दाखल करून वंदे मातरम् विषयी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे जारी करावीत अशी मागणी केली. या याचिकेतील काही मागण्यांच्या अनुरोधाने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली असून देशातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् आवश्यक करावे असा आदेश दिला आहे. या संबंधात सरकारचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने सरकारला एक महिन्याची नोटीस दिली आहे. या संबंधात केंद्र सरकार जे म्हणणे मांडेल त्यावरून देशव्यापी वाद होणार आहे. गेल्या वर्षीच हा वाद होऊन थांबला. वंदे मातरम् न म्हणणे म्हणजे देशद्रोह हे समीकरण मुस्लीम समाजाला सरसकट मान्य नाही. कारण अल्लाह शिवाय कोणाचेही गुणगान करण्यास इस्लाम धर्म मनाई करतो.

त्यामुळे वंदे मातरम्चे गायन सुरू असेल तेव्हा मुस्लीम ते गीत म्हणणार नाहीत. परंतु त्याचा अनादरही करणार नाहीत. त्यांच्यासोबतचे हिंदू वंदे मातरम्चे गायन होताना स्तब्धपणे उभे राहणार असतील तर मुस्लीमसुध्दा उभे राहतील. आता सध्या विधिमंडळात, महापालिकात आणि इतर अनेक संस्थांमध्ये वंदे मातरम् म्हटले जाते आणि मुस्लीम त्याचा आदरही करतात. परंतु काही कट्टर हिंदुत्ववादी या प्रकाराला विपरित वळण देत आहेत. मशिदीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या जाणार्‍या अजानीबाबतचा मुद्दा मात्र वेगळा आहे. तो आता सोनू निगम या गायकाच्या ट्विटवरून उपस्थित झाला आहे. मुस्लीम लोक अजानासाठी ध्वनिक्षेपक वापरण्याबाबत आग्रही आहेत. तो आग्रह पूर्णपणे असमर्थनीय आहे कारण कुराणामध्ये काही ध्वनिक्षेपकावरून अजान दिली जावी असे म्हटलेले नाही. ही ध्वनिक्षेपकावरील अजान बंद झालीच पाहिजे मात्र ती बंद करताना मंदिर आणि शिखांच्या गुरुद्वारांमध्येही होणारा ध्वनिक्षेपकाचा वापर हाही थांबलाच पाहिजे. जसे कुराण ध्वनिक्षेपकाचा आग्रह धरत नाही तसेच वेदही धरत नाहीत आणि पुराणेही धरत नाहीत. धर्माचे पालन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु धर्माचे पालन करताना इतरांना उपद्रव होता कामा नये हे बंधन सर्व धर्मांना आहे. भारतात धर्माचे आणि धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याची सवय आहे. ती बंद झाली पाहिजे. सध्या समोर आलेल्या या विषयांचा विचार केला असता प्रत्येकाचे उत्तर हे वेगळे आहे हे लक्षात येईल.

Leave a Comment