४ लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करणार केंद्र सरकार


नवी दिल्ली – केंद्र सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून सरकारने गेल्या तीन वर्षात आयकर परतावा न भरणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरातील सुमारे चार लाख कंपन्यांची नोंदणीच केंद्र सरकारने रद्द केली आहे.

याबाबतचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या महिनाभरापासून आयकर परतावा भरल्याची माहिती न देणाऱ्या कंपन्यांना कंपनी व्यवहार मंत्रालयाने नोटीस पाठवण्याची मोहीमच हाती घेतली होती. २०१३-१४ , २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये या कंपन्यांनी आयकर परतावा भरल्याची माहिती सादर न केल्यामुळे कंपनी व्यवहार मंत्रालयाने या कंपन्यांची नोंदणीच रद्द केली आहे. पण या कंपन्यांना आणखी एक संधीदेखील देण्यात आली आहे. ३० दिवसांमध्ये आयकर परतावा भरल्याची माहिती या कंपन्यांना सादर करता येईल. पण त्यानंतरही या कंपन्यांनी माहिती दिली नाही तर या कंपन्यांची नावे जाहीर केले जातील असे सूत्रांनी सांगितले. कंपनी व्यवहार मंत्रालय या कंपनीचे नाव आणि संचालकांची माहिती आयकर विभाग, रिझर्व्ह बँक तसेच देशभरातील महत्त्वाच्या बँकांना देणार असल्यामुळे कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध येतील असा दावा केला जात आहे.

Leave a Comment