खडसे अडचणीत


छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, पंकज भुजबळ, एकनाथ खडसे अशा नेत्यांवर कोणत्याही क्षणी कसलेही खटले भरले जाण्याची शक्यता असते. त्यातले काही खटले अजून तक्रारीच्या स्वरूपातच दाखल झालेले नसतात. म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेत असतात. तर काही प्रकरणांमध्ये बराच बभ्रा होऊनही काहीच तथ्य नसल्याचे दिसत असते. हा सगळा न्यायालयीन कामकाजाचा भाग असतो. त्यामुळे कोणावरच्या खटल्यामध्ये नेमके काय चालले आहे हे सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे हा सामान्य माणूस सर्वांना एकाच मापाने मोजत असतो. ज्यांच्यावर खटले सुरू असतात. ते जोपर्यंत अटकेत पडत नाहीत तोपर्यंत इतक्या आत्मविश्‍वासाने बोलत असतात की जणू ते प्रभू रामचंद्राचा अवतारच आहेत.

एकनाथ खडसे हे भाजपाचे नेते असेच कालपरवापर्यंत आत्मविश्‍वासाने विधाने करत होते. आपण एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही आणि आपल्यावर केले जाणारे आरोप पूर्णपणे निराधार असून त्यांचा थोडासाही पुरावा उपलब्ध नाही. अशा वल्गना ते करत होते. परंतु आता ही गोष्ट माहीत करून घेतली पाहिजे की खडसेंचा पाय वरचेवर खोलात चालला आहे. त्यांनी भोसरीजवळ तीन एकर जमीन अतीशय अल्प किंमतीत घेतली. ती जमीन वादातली आहे हे माहीत असूनही त्यांनी ती खरेदी केली. आपला महसूल मंत्रीपदाचा प्रभाव वापरून हा वाद आपण मिटवू शकू आणि वादातली जमीन वादातीत करून ती घशात घालू असा त्यांचा भाव होता. म्हणूनच जमीन खरेदी करताना ती वादातली आहे हे त्यांना माहीत होते. परंतु त्यांनी प्रत्यक्षात आपल्याला या जमिनीविषयी काही माहितीच नव्हती असा आव आणला. हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा मात्र त्यांचा पोलखोल झाला आणि जमीन वादग्रस्त असल्याचे माहीत असूनही त्यांनी ती घेतली हे दिसून आले. परिणामी न्यायालयाने त्यांच्या खटला भरण्याचा आदेश दिला.

राज्याच्या आणि केंद्राच्या पातळीवर ज्या नेत्यांच्यावर खटले भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला त्या नेत्यांना पुढे फार पश्‍चात्ताप करावा लागला आहे. छगन भुजबळ यांच्यावरही कारवाई करावी असा आग्रह न्यायालयाने धरला होता. तीच गोष्ट आता खडसेंच्या बाबतीत घडलेली आहे. एवढ्यावर हे प्रकरण थांबलेले नाही. खडसे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका अंजली दमानिया यांनी दाखल केली आहे. अशा प्रकारची याचिका दाखल होणे हे खडसे यांच्यादृष्टीने मोठ्या धोक्याचे लक्षण आहे आणि पुढची किमान दहा वर्षे त्यांचे सारे आयुष्य या खटल्यामध्ये गुंतून पडणार आहे. अटकेची तर कधीही शक्यता आहे.

Leave a Comment