किया मोटर्सचा आंध्रात उत्पादन प्रकल्प


जागतिक पातळीवरची बडी कार उत्पादक कंपनी ह्युंडाईची सबसिडरी किया मोटर्सने भारतात १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून देशातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक ठरली आहे. हा प्रकल्प आंध्रप्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील पेनकोंडा येथे उभारला जात असून त्यासाठीची जमीन खरेदी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजते.

ह्युंडाईने दोन वर्षांपूर्वी भारतातील चार राज्यात कारखाना उभारणीसाठी शोधमोहिम सुरू केली होती. त्यातील पहिला कारखाना आंध्रात सुरू केला जात आहे. यामुळे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या बिझिनेस फ्रेंडली प्रतिमेला अधिक झळाळी मिळाली असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. दोन टप्प्यात ही गुंतवणूक केली जात आहे. पहिल्या ६ हजार कोटींच्या टप्प्यात वर्षाला ३ लाख कार उत्पादनाचे लक्ष्य ठेवले गेले आहे. २०१४ साली पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडियाची मोहिम सुरू केल्यानंतर आक्टोबर २०१४ पासून ते मे २०१६ पर्यंत एफडीआय इक्विटी इनफ्लोमध्ये ४६ टक्के वाढ झाली असून ही गुंतवणूक ६१.५८ कोटी डॉलर्सवर पोहोचली असल्याचेही समजते.

Leave a Comment