या गावात राहतात पंतप्रधान, आयजी, नोकिया, फालतू


राजस्थानच्या बुंदी शहरापासून जवळच असलेल्या रामनगर या गावातील लोकांना मुलांची अजब नावे ठेवण्याचा जणू शौक आहे. साधारण ५०० लोकवस्ती असलेल्या व कंजड जमातीच्या या समुदायात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे पण येथील मुलांची नांवे मात्र पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल अशी आहेत तशीच अनेक कंपन्या, न्यायालये व उच्च पदांवरूनही नांवे ठेवली गेली आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांची नांवेही मुलांना दिली गेली आहेत.

कलेक्टरची या गावाला भेट झाली त्यावेळी त्यांचा रूबाब पाहून मुलांना कलेक्टर, आयजी, हवालदार, अशी नांवे दिली गेली तर एका अपंग मुलाच्या जन्माच्यावेळी त्याच्या आजोबांना हायकोर्टातून जामीन मिळाला म्हणून मुलाचे नांव हायकोर्ट ठेवले गेले आहे. इंदिरा गांधींच्या प्रभावाचा परिणाम म्हणून येथे सोनिया, राहुल आहेत तसेच मॅजिस्ट्रेटही आहेत. मोबाईल कंपन्यांवरून नोकिया, सॅमसंग अशी नांवे आहेत तशीच सिमकार्ड, मिस कॉल, जिओनी, चिप, अशीही नांवे आहेत. येथील नोंदणी अधिकारी सांगतात, सुरवातीला आम्हाला ही नांवे ऐकून विचित्र वाटत असे आता मात्र त्याची सवय झाली आहे. या नांवात आता स्मार्टफोन व अँड्राईड यांचीही भर पडली आहे.


मुलींच्या नावात मात्र इतकी विविधता नाही. त्यांची नांवे साधारणपणे सोनिया, नमकीन, मिठाई आणि अगदी फालतू अशीही आहेत. सगळ्यात मजा म्हणजे या गावात अशी नांवे ठेवण्याची प्रथा बर्‍याच काळापासून सुरू आहे त्यामुळेच येथील ५० वर्षे वयाचा कलेक्टर शाळेचे तोंडही न पाहिलेला आहे.

Leave a Comment