पीएफवर आता मिळणार ८.६५ टक्के व्याजदर


नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफवर २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याजदर लागू करण्यासाठी परवानगी दिली आहे. जवळपास ४ कोटी नोकरदारांना अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे फायदा होऊ शकतो.

विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाने २०१५-१६ साठीचे व्याजदर सीबीटीमार्फत (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज) ८.८ टक्क्यांवरुन ८.७ टक्के केले होते. मोठ्या प्रमाणात या निर्णयावर टीका झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेत व्याजदर ८.८ टक्के केले. अर्थ मंत्रालयाकडून सातत्याने कामगार मंत्रालयाला पीएफ व्याजदर कमी करण्यासाठी सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नोकरदारांसाठी हा दिलासादायक निर्णय म्हणता येईल.

व्याजदरामुळे रिटायरमेंट फंड म्हणजे सेवानिवृत्ती निधीचा तोटा होऊ नये, अशी अट अर्थ मंत्रालयाने घातली आहे. ईपीएफओचे केंद्रीय बोर्ड म्हणजे सीबीटीने ८.६५ टक्के व्याजदर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामगार मंत्रालयाकडून नोकरदारांना आता ८.६५ टक्के व्याजदर दिले जाईल.

Leave a Comment