केवळ २० पैशांत विकली जात आहे तुमच्या बँक खात्यांची माहिती


नवी दिल्ली – देशातील किमान एक कोटीहून अधिक बँक खात्यांची माहिती लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून दिल्ली पोलिसांनी भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती जमा करून विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही माहिती केवळ १० ते २० पैशांत विकली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात राहणाऱ्या एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या क्रेडिट कार्डवरून १.४६ लाख रुपये गायब केले गेले. या घटनेचा तपास करताना बँक खात्यांची माहिती लीक करणारे एक रॅकेट सापडले. या रॅकेटमध्ये बँकेत आणि कॉल सेंटर्समध्ये काम करणारे कर्मचारीही सामील आहेत. ग्राहकांच्या खात्याची माहिती हे आरोपी घेतात आणि नंतर ही माहिती विकतात. हे रॅकेट चालवणा-या सूत्रधारालाही पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पांडवनगरमध्ये पुरन गुप्ता या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. गुप्ताने यापूर्वीही ५० हजार लोकांची माहिती विकली होती. अवघ्या १० ते २० हजारांमध्येच त्याने या ५० हजार नागरिकांची माहिती विकल्याची माहिती उघड झाली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये लोकांचे बँक खाते, क्रेडिट व डेबिट कार्डचा तपशील आणि पासवर्ड, जन्मतारीख आणि इतर महत्वाच्या माहितीचा समावेश आहे.

Leave a Comment