चुकीला माफी देणार व्हॉटसअॅप


नवी दिल्ली – एखादा सेंड झालेला संदेश मागे घेण्याची सुविधा (रिव्होक) व्हॉटसअॅप या लोकप्रिय मेसेंजर अॅपवर येणार असून याव्यतिरिक्त अन्य काही नव्या सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहेत.

सध्या भारतासह जगातील अनेक देशात जलद आणि वेगवान संदेश देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉटसअॅप लोकप्रिय आहे. मात्र, एखादवेळी अनावधनाने नको त्या व्यक्तीला किंवा समूहाला नको तो मेसेज सेंड होतो. अशा वेळी तो संदेश मागे घेता येत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी व्हॉटसअॅप प्रयत्नशील आहे.

व्हॉटसअॅपच्या अपडेटसबद्दल माहिती देणाऱ्या ट्विटरवरील @WABetaInfo या पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हॉटसअॅपच्या ०.२.४०७७ या वेब व्हर्जनवर ‘रिव्होक’ची सुविधा देण्यात आल्याचा दावाही @WABetaInfo ने केला आहे. तर लवकरच मेसेजमधील टेक्‍स्टला बोल्ड, इटॅलिक वगैरे सारखे फॉरमॅटिंग करण्यासाठी शॉर्टकटस्‌ही देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. ही सुविधा व्हॉटसअॅपच्या बीटा व्हर्जनवर सुरु करण्यात आली असल्याची माहितीही दिली आहे.

एखादा मेसेज सेंड झाल्यानंतर सेंड झाल्यापासून पुढील पाच मिनिटे तुम्हाला तो मेसेज मागे घेण्यासाठी सुविधा देण्यात येईल. मात्र, एकदा हे पाच मिनिटे झाले तर पुन्हा तुम्हाला तो संदेश अनसेंड करता येणार नाही.

Leave a Comment