फेसबुकने बंद केली ३० हजार फेक अकाऊंट!


मुंबई: फेसबुकने फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ३० हजार फेक अकाऊंट बंद केली आहेत. फेसबुकने ही कारवाई चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याप्रकरणी केली आहे.

अफवा, भ्रम आणि दिशाभूल करणारे बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही सर्वच अकाऊंट सध्या बंद करु शकलो नसलो, तरी आम्ही चांगले काम करत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. जे अकाऊंट बंद केले आहेत, ते आमच्या रडारवर होते. ते फेक अर्थात बनावट असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असेही स्पष्टीकरण फेसबुकने दिले आहे.

बनावट अकाऊंट बंद केल्यामुळे खोट्या बातम्या, धोकेबाजी आणि राजकीय ट्रोलिंगला आळा बसेल, असेही फेसबुकने म्हटले आहे. तसेच सध्या फेसबुकचे अशा अकाऊंटवर सातत्याने लक्ष असून, बनावट अकाऊंट बंद करण्याचे मोठे आव्हान आहे. फ्रान्समध्ये सध्या निवडणुकीचा काळ आहे. मात्र या निवडणुकीत अनेक खोट्या बातम्या फेसबुकच्या माध्यमातून पसरत असल्यामुळेच हे पाऊल फेसबुकने उचलले आहे.

Leave a Comment