मोबाईलपासून दूर


जगातला तिसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत माणूस वॉरेन बफेट मोबाईल फोन वापरत नाही. परंतु मोबाईल न वापरण्याचा कसलाही परिणाम त्याच्या श्रीमंतीवर झालेला नाही. नुकतीच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक झाली. अशा बैठकांमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे फोन येत राहतात आणि ते लोक बैठकीवर लक्ष केंद्रीत करून शकत नाहीत. त्यामुळे जगातल्या एवढ्या श्रेष्ठ लोकांनी बैठक होईपर्यंत आपले मोबाईल फोन बैठकीच्या हॉलच्या बाहेर ठेवण्याचा निर्धार केला आणि तो पाळला. त्याचा त्यांच्या कामकाजावर चांगला परिणाम झाला. कोणाचाही मोबाईल बाहेर ठेवल्याचे कसलेही नुकसान कोणाला सहन करावे लागले नाही. मात्र आपणच सामान्य लोक मोबाईल फोन ही आपली आवश्यक गरज आहे असे समजून तिच्या एवढ्या आहारी जातो की त्याला आपला एक अवयव असल्याप्रमाणे सतत बाळगत राहतो.

अनेक लोकांना मोबाईल फोनवर सतत कोणाशी तरी बोलल्याशिवाय, त्याच्यावरून मॅसेज घेण्याशिवाय आणि ही दोन्ही कामे नसतील तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शोज बघण्याचा एवढा शौक असतो की त्यापोटी ते अनेक गोष्टी गमावून बसतात. ऑफिसमधून घरी आले तरी ते रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत हातातला मोबाईल बाजूला ठेवतच नाहीत. त्याचा त्यांच्या झोपेवर परिणाम होत असतो. खाण्यावर परिणाम होत असतो आणि मेंदूवरसुध्दा अनेक प्रकारचे परिणाम होत असतात. रोहन वर्मा या आयटी इंजिनियरने एकदा मोबाईलचीही गुलामगिरी संपवण्याचा निर्धार केला. त्याने रात्री आठनंतर मोबाईलला हातच लावायचा नाही असा निश्‍चय केला आणि तो पाळला. त्याने आठवडाभर आपल्याला काय काय अनुभव आले हे लिहून ठेवले आहेत.

त्याला मोबाईलच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे रात्री साडेनऊ वाजता छान झोप लागली. सकाळी तो अतीशय ताजातवानना होऊन उठलाच परंतु दररोज रात्रीचे जेवण कुटुंबासहीत घ्यायला लागला. बर्‍याच दिवसांपासून त्याने एक पुस्तक वाचत आणले होते परंतु रात्रंदिवस मोबाईलला चिटकून असल्यामुळे महिन्याभरापासून त्या पुस्तकाची पाच-पंचवीस पानेही वाचून पूर्ण झालेली नव्हती. मात्र रात्री आठनंतर मोबाईलला हात लावायचा नाही हा त्याचा निर्धार या वाचनासाठी उपयोगाला पडला. आठवडाभरात ते पुस्तक वाचून पूर्ण झाले. तो अनेकांशी बोलायला लागला. मन मोकळे करायला लागला. त्यामुळे त्याच्या हृदयावरचा ताणसुध्दा कमी झाला.

Leave a Comment