डिजिटलमधील धोके


केंद्र सरकार भारतातल्या नागरिकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. परंतु कधी कधी अशा काही धक्कादायक घटना घडतात की लोकांचा डिजिटल व्यवहारांवरचा विश्‍वास उडण्याची शक्यता असते. त्यामुळे डिजिटल व्यवहाराचा आग्रह धरताना अशा धक्कादायक घटनांपासून कसा बचाव करावा याचेही शिक्षण दिले जाण्याची गरज आहे. सध्या केंद्र सरकारतर्फे विविध कार्यक्रमांमधून असे प्रशिक्षण दिलेही जात आहे आणि त्यात एक गोष्ट आवर्जुन सांगितली जाते. ज्या क्रमांकांच्या आधारावर आपले आर्थिक व्यवहार होणार आहेत त्यातले काही क्रमांक गोपनीय ठेवायचे असतात. ते कोणालाही सांगायचे नसतात. मात्र काही कारणांनी आपण ते कोणाला सांगायला लागलो तर त्याचा गैरवापर होऊन आपले पैसे परस्पर काढले जाण्याची शक्यता असते.

कधीतरी आपल्याला अचानक फोन येतो आणि आपण केलेल्या एखाद्या ऑनलाईन खरेदीतून लकी ड्रॉ काढलेला असून आपल्याला कार बक्षीस मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंतु या कारचे काही कर आपल्याला भरावे लागणार आहेत आणि ते आपण ताबडतोब त्या फोन करणार्‍याला द्यायचे आहेत अशी सूचना आपल्याला दिली जाते. कार मिळणार म्हटल्याबरोबर आपण आपला अकाऊंट नंबर आणि न सांगायच्या काही गोष्टी त्या व्यक्तीला सांगून बसतो आणि येथेच आपण अडचणीत येतो. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राष्ट्रपतींचा फोन आला तरी आपल्या एटीएम कार्डाचा पिन नंबर किंवा ऑनलाईन खात्याचा पासवर्ड सांगता कामा नये.

लोकांचे पैसे बँकेतून चोरट्या काढणार्‍या लोकांच्या उपयोगासाठी एका व्यक्तीने देशातल्या अनेक लोकांचे असे क्रमांक मिळवले आहेत आणि जवळपास १ कोटी लोकांचे असे क्रमांक त्याने विक्रीला काढले आहेत. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा कबूलही केला आहे. अर्थात त्याला मिळालेल्या माहितीमध्ये पिन नंबर होतेच असे नाही मात्र जी माहिती त्याला मिळायला नको होती अशी काही माहिती त्याला मिळालेली होती. तेव्हा डिजिटल आर्थिक व्यवहार करताना आपण सावध राहिले पाहिजे. आपला पिन क्रमांक जगातल्या कोणालाही सांगण्याची कसलीही जबाबदारी आपल्यावर नाही. ते जाणून घेण्याचा कोणलाही अधिकार नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. एवढी दक्षता घेतली की आपले आर्थिक व्यवहार कधीही धोक्यात येणार नाहीत.

Leave a Comment