पुन्हा एकदा चलनकल्लोळ


मुंबई : पुन्हा एकदा एटीएममध्ये चलन तुटवड्यामुळे खडखडाट पाहायला मिळत असल्यामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहे. ही समस्या मागील गेल्या दहा दिवसांपासून सुरू असून त्यातच आता गुड फ्रायडे आणि रविवार आल्यामुळे नागरिकांना आणखी तीन चार दिवस हा त्रास सहन करावा लागू शकतो.

चलनाचा पुरवठा रिझर्व्ह बँकेकडून कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून एटीएम रिकामे झालेले दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून मागणीच्या तुलनेत केवळ २५ टक्के चलनाचा पुरवठा होत असल्यामुळे ही चलन टंचाई जाणवत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. ही टंचाई महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये सर्वाधिक आहे. याचा फटका शहरी भागासोबतच ग्रामीण भागालाही बसत आहे. तर उत्तरेकडचे राज्य म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पुर्वेकडील पश्चिम बंगाल, ओडीशामध्ये चलनाचा मोठा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्या राज्यात चलनाची टंचाई नाही. त्यातच आता शुक्रवारी आणि रविवारी बँका बंद असल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.

राज्यातील निवडणुकांमुळे रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा सर्वाधिक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment