योगी सरकार गरीब मुस्लीम मुलींचे सामुहिक विवाह करणार


राज्यातील गरीब मुस्लीम मुलींचे सामुहिक निकाह लावून देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. यासाठी येणारा खर्च केंद्र व राज्य सरकार करणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा सामुहिक विवाहांचे म्हणजेच इज्तिमाई निकाहांचे) आयेाजन केले जाणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहसीन रजा यांच्याबरोबर मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी यांनी चर्चा केल्यानंतर त्यासंदर्भातला निर्णय घेतला गेला.

मोहसीन रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी लखनौत आले होते तेव्हा मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या चर्चेत आदित्यनाथ योगींनी ही कल्पना त्यांच्यासमोर मांडली होती. त्यासाठी राज्यभर सद्भावना मंडप उभारले जात आहेत. तेथे इस्लामिक पद्धतीने हे निकाह केले जातील. अशा विवाहांसाठी अनुदान म्हणून दिल्या जाणार्‍या पैशांतून नवविवाहितांना प्रपंचासाठी लागणार्‍या वस्तू दिल्या जाणार आहेत. अशिक्षित मुलींना कौशल्य विकास तसेच हँडीक्राफ्टचे शिक्षणही याच ठिकाणी दिले जाईल व ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्या गरीब मुस्लीम मुलींच्या शिक्षणाची सोयही केली जाणार आहे.

पहिल्या प्रयत्नात असे १०० विवाह करण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रयोग यशस्वी ठरला तर दर सहा महिन्यांनी असे सामुहिक विवाह आयेाजित केले जातील तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील दोन मुलींच्या लग्नासाठी २० हजार रूपये देण्याच्या प्रस्तावालाही योगी सरकारने मंजुरी दिल्याचे मोहसीन रजा यांनी सांगितले.

Leave a Comment