आईसलँडमध्ये लाव्हा रसापासून होणार वीज निर्मिती


ज्वालामुखीच्या सानिध्यात असलेल्या आईसलँड मध्ये लाव्हा रसापासून वीजनिर्मिती करण्याची योजना आखली गेली आहे. लाव्हापासून वीज निर्मिती करणारा आईसलँड हा जगातील पहिलाच देश आहे. या देशाची ६५ टक्के ऊर्जा गरज जलविद्युत व भूतपीय उर्जेने भागविली जाते. आता त्यात लाव्हापासून बनलेल्या वीजेची भर पडू शकणार आहे.

आईसलँडच्या जिओथर्मल रिसर्च ग्रुप व ब्रिटीश जिओथर्मल सर्वेक्षण वैज्ञानिकांच्या प्रयत्नातून हा प्रयोग साकारला जात आहे. यात लाव्हापासून निर्माण होणार्‍या पाण्याच्या वाफेचे रूपांतर उर्जेत केले जाणार आहे. पारंपारिक उर्जास्त्रोतापेक्षा १० पट अधिक उर्जा यातून निर्माण होऊ शकेल व ही वीज आईसलिंक केबलमधून ब्रिटनला विकली जाणार आहे. या वीजेमुळे ब्रिटनमधील १६ लाख घरांना वीज मिळणार आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी १ हजार किमीची आईसलिंक केबल टाकली जात आहे.२०२० मध्ये या ऊर्जेचा पहिला हिस्सा वापरता येईल. क्राफ्ला मॅग्मा टेस्टबेड नावाने हा प्रकल्प आकारास येत आहे.

अमेरिका, कॅनडा, रशिया व अन्य ११ देशातील शिक्षण संस्था व कंपन्या या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत. उत्तर आईसलँडमधील क्राफ्ला ज्वालामुखी मध्ये ४.८ किमी खोलीचे विवर त्यासाठी केले गेले आहे. येथील तापमान ४०० ते १००० डीग्रीपर्यंत असून अतिदाब व लाव्हाच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होते व त्यापासूनच वीज निर्माण केली जाणार आहे.

Leave a Comment