नुकत्याच पार पडलेल्या दहा विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांपैकी ४ पोटनिवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. तर ६ जागांवर अन्य पक्षांनी दावा सांगितला आहे. भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या चार जागांमध्ये दिल्लीतल्या राजौरी विधानसभा मतदारसंघांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कारण या मतदारसंघात भाजपाने आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. ही जागा पूर्वी आम आदमी पार्टीकडे होती आणि आपचे आमदार जर्नेल सिंग यांनी पंजाबातील विधानसभा निवडणुकीस उभे राहण्यासाठी राजौरीच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. ही जागा आपची असल्यामुळे ती आपने जिंकणे अपेक्षित असताना अनपेक्षितपणे भाजपाने जिंकली.
भाजपाचा राजौरी विजय
केवळ जिंकलीच असे नाही तर आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला तिसर्या क्रमांकावर ढकलून ही जागा जिंकली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पार्टीने या विधानसभेत ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हातून ही जागा निसटेल असे कधी वाटले नव्हते. पण प्रत्यक्षात तसे घडले. भाजपाच्या उमेदवारांनी ४० हजार ६०२ मते मिळवली. दुसर्या क्रमांकावर कॉंग्रेसचा उमेदवार राहिला. त्याला २५ हजार ९५० मते मिळाली. तर आम आदमी पार्टीचा उमेदवार १० हजार मते कमावून तिसर्या क्रमांकावर तर राहिलाच पण त्याची अनामत रक्कमसुध्दा जप्त झाली.
विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीला महत्त्व आले होते. कारण आता सध्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. २३ एप्रिलला होणार असलेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागेल याचा अंदाज राजौरी विधानसभा मतदार संघातल्या या पोटनिवडणुकीच्या निकालावरून येत आहे. हा निकाल पाहिल्यानंतर आता आपण महापालिकेची निवडणूक जिंकल्यात जमा आहे असा विश्वास भाजपाच्या नेत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतु आम आदमी पार्टीचे नेते तसे मानण्यास तयार नाहीत. या पोटनिवडणुकीतल्या निकालाचा परिणाम महानगरपालिकेच्या मतदानावर होणार नाही असा विश्वास आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे. परंतु पोटनिवडणुकीतल्या निकालाने दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पोरकट राजकारणाला चांगलेच उत्तर दिले आहे अशी बर्याच मतदारांची भावना आहे.