भाजपाचा कर्नाटकात पराभव


कर्नाटकाच्या नंजनगुड आणि गुंडलूपेट या दोन विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा धक्का भाजपाला सहन करावा लागला आहे. हे दोन मतदारसंघ दक्षिण कर्नाटकातील आहेत आणि तिथे भाजपाला काही स्थान नाही असे मानले जाते. पण तरीही नवे जातीय समीकरण आणि मोदी लाट या दोन गोष्टींच्या जोरावर भाजपाला तिथे यश मिळेल असा विश्‍वास भाजपा नेते व्यक्त करत होते. मात्र या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले. कॉंग्रेसला तर दिलासा मिळालाच पण २०१८ साली कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांच्या मनात विधानसभेतही आपला विजय होईल असा दिलासा निर्माण झाला आहे.

नंजनगुड मतदारसंघातील कॉंग्रेसचे माजी आ. श्रीनिवास प्रसाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले श्रीनिवास प्रसाद आता भाजपात आलेले होते आणि भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. परंतु कॉंग्रेसचे नेते के. एन. केशवमूर्ती यांनी त्यांचा २० हजारांपेक्षाही अधिक मतांनी पराभव केला. २०१३ साली याच दोघात निवडणूक झाली होती पण त्यावेळी श्रीनिवास प्रसाद कॉंग्रेसचे उमेदवार होते तर केशवमूर्ती हे जनता दलाचे उमेदवार होते. दरम्यानच्या काळात श्रीनिवास प्रसाद कॉंगे्रसमधून भाजपात आले आणि केशवमूर्तींनी जनता दल सोडून कॉंग्रेसचा हात हाती घेतला आणि या दोघांत पुन्हा निवडणूक झाली. त्यात भाजपाचे झालेले श्रीनिवास प्रसाद पराभूत झाले.

दुसरा मतदारसंघ म्हणजे गुंडलूपेट. जिथे भाजपाचा फार प्रभाव नव्हता माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा हे आपल्या लिंगायत समाजातील नेत्यांचे आणि दलित मतदारांचे मनोमिलन घडवून आणतील आणि त्यातून ही जागा जिंकतील असा अंदाज होता. कर्नाटकात दक्षिण भागामध्ये जिथे दलित मतदारांचे प्रमाण मोठे आहे तिथे या निवडणुका झाल्या. मात्र भूतपूर्व मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा हे भाजपात आले असल्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे वजन निर्माण होईल अशी आशा वाटत होती. तीही फोल ठरली. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे निकाल लागल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांचे मनोबल वाढले आहे आणि भाजपाला कर्नाटक विधानसभेवर आपला झेंडा फडकावण्यासाठी बरेच परीश्रम करावे लागतील असा संकेत मिळाला आहे.

Leave a Comment