दिल्लीत उभारला जातोय सर्वात उंच अशोकस्तंभ


दिल्लीच्या इतिहासात एक सोनेरी पान लवकरच जोडले जात आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध जनपथावर जगातील सर्वात उंच अशोक स्तंभ उभारला जात असून या स्तंभाची उंची ७० फूट आहे. शिल्पकार राम सुतार जनपथावरील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर समोर हा स्तंभ उभा करणार आहेत. जगातला सर्वाधिक उंचीचा अशोकस्तंभ सध्या सारनाथ येथे असून तो पूर्ण दगडांचा व ५० फूट उंचीचा आहे.

अशोक स्तंभ हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. दिल्लीतील स्तंभासाठी मजबूत दगडी पायाभरणी केली गेली आहे. एकूण ७० फूट उंचीमध्ये ५८ फुटाचा स्तंभ व १२ फुटाचे त्यावरचे चतुर्मुख सिंह असतील. हा स्तंभ पूर्ण होण्यासाठी ३ महिने लागतील. हा स्तंभ धातूंच्या मिश्रणापासून तयार केला जाणार आहे. त्यात तांबे ८५ टक्के तर जस्त, शिसे व टीन यांचे प्रमाण प्रत्येकी ५ टक्के असेल. त्यावर केमिकल कोटिंग केले जाईल यामुळे वादळावार्‍यात तसेच पावसात तो कित्येक वर्षे सुस्थित राहील. शिल्पकार राम सुतार यांनी यापूर्वी जगातला सर्वात उंच शिवाजी पुतळा तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार केले आहेत. अशोक स्तंभाची १२ फुटांची फायबर प्रतिकृती त्यांनी तयार केली आहे.

Leave a Comment