केवळ एका दिवसात मिळणार टॅन, पॅन क्रमांक


नवी दिल्ली – कंपनी व्यवहार मंत्रालयाबरोबर पॅन, टॅन क्रमांक एका दिवसात देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने (सीबीडीटी) सामंजस्य करार केला. हे पाऊल ईज ऑफ डुईंग बिझनेसनुसार उचलण्यात आले.

अर्थ मंत्रालयाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकानुसार, अर्जदार कंपन्या कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवरील ‘स्पाईस’ या नावाने असलेला अर्ज भरू शकतात. संपूर्ण माहिती भरण्यात आल्यानंतर तत्काळ ही माहिती सीबीडीटीकडे पाठविण्यात येईल. यानंतर अर्जदाराच्या हस्ताक्षराविना पॅन अथवा टॅन क्रमांक जारी करण्यात येईल.

मार्च २०१७ मध्ये नवीन स्थापन करण्यात आलेल्या १०,८९४ नवीन कंपन्यांना चार तासांत पॅन क्रमांक देण्यात आला. ९४.७ टक्के प्रकरणात चार तास आणि ९९.७३ टक्के प्रकरणात एका दिवसात पॅन क्रमांक देण्यात आला. सध्या वापरात असलेल्या प्रक्रियेपेक्षा नवीन प्रक्रिया अधिक सोपी आहे. याचप्रमाणे अर्जदारांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल.

सीबीडीटीने इलेक्ट्रॉनिक पॅन कार्डची (ई-पॅन) सेवा सुरू केली आहे. या सेवेनुसार पॅन कार्ड ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल आणि यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल. ई-पॅन हे एक डिजिटली हस्तांक्षरित कार्ड असणार आहे. हे कार्ड इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दुस-या संस्थेकडे पाठविता येईल या डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येईल.