३० एप्रिलपर्यंत बँकेला द्या तुमच्या ‘आधार’ची माहिती


नवी दिल्ली – बँक अथवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित खाती जुलै २०१४ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत उघडलेल्या व्यक्तींनी ३० एप्रिलपर्यंत केवायसी आणि आधार कार्ड क्रमांक संबंधित बँक अथवा वित्त संस्थांना दिला नाही तर ती खाती बंद होण्याची शक्यता आहे. तशी माहिती आयकर विभागाने दिली आहे. तसेच ३० एप्रिलपर्यंत एफएटीसीए (फॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अॅक्ट) नुसार आवश्यक सर्व कागदपत्रे स्वतः साक्षांकित केलेली असावीत, असेही आयकर विभागाने म्हटले आहे.

निर्धारित वेळेत बँक आणि वित्त संस्थांना खातेधारकांनी आवश्यक माहितीची साक्षांकित कागदपत्रे सादर न केल्यास खाती ब्लॉक करण्याचे अधिकार त्यांना आहेत. खाती ब्लॉक केल्यानंतरही सर्व आवश्यक माहितीची कागदपत्रे सादर केल्यास ती पुन्हा सुरूही करण्यात येतील. विदेशी खाते कर अनुपालन कायद्यांतर्गत असलेल्या खात्यांनाच हा नियम लागू होणार आहे.

भारत आणि अमेरिकेने जुलै २०१५ मध्ये ‘एफएटीसीए’वर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. हा अमेरिकेतील नवीन कायदा आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सूचनांबाबत देवाण-घेवाणची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे करचोरी करणाऱ्यांबाबतची माहितीची उभय देशांना देता येणार आहे. त्यामुळे ३० एप्रिल २०१७ पर्यंत आवश्यक सर्व माहितीची स्वतः साक्षांकित केलेली कागदपत्रे संबंधित बँका आणि आर्थिक संस्थांना सादर करण्यासंबंधीची सूचना खातेधारकांना दिली गेली पाहिजे, असे आयकर विभागाने म्हटले आहे. खातेधारकांना केवायसी आणि आधार कार्ड क्रमांकही द्यावा लागणार आहे. ३० एप्रिलपर्यंत केवायसी आणि आधार कार्ड क्रमांक संबंधित बँक अथवा वित्त संस्थांना दिला नाही तर ती खाती बंद होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment