समझोता किती टिकावू?


राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात काही चर्चा होणार असेल तर ती चर्चा मातोश्रीवरच होईल, आम्ही कोणाच्या घरी चर्चा करायला जाणार नाही अशा डरकाळ्या फोडणारे शिवसेनेचे नेते काल रालो आघाडीच्या बैठकीला दिल्लीत हजर झाले. तीन वर्षांपासून शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत आणि महाराष्ट्रातसुध्दा कोणत्या का पध्दतीची होईना पण भाजप आणि शिवसेना यांची आघाडी आहे. शिवसेना भाजपावर किती कटुतेने टीका करते हे तर आपण पाहिलेलेच आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे नेते आणि शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्यात गेल्या तीन वर्षात चर्चाच नव्हती. ती काल झाली. ठाकरे आणि अमित शहा यांची आधी बोलणी झाली. नंतर ठाकरे मोदींना भेटले. या भेटीत उध्दव ठाकरे पूर्णपणे नरमलेले दिसले.

नरेंद्र मोदी तर आपले भाऊ आहेत. त्यामुळे आपण त्यांना नरेंद्रभाई म्हणत असतो. आपण भाजपवर टीका केली तरी ती चांगल्यासाठीच असते वगैरे संपादनी उध्दव ठाकरे यांनी केली. एकंदरीत भाजपा आणि शिवसेना यांच्या संबंधांच्या आघाडीवर सध्या भाजपाला समाधान वाटावे असे चित्र आहे. दिल्लीत ही सारी बैठक सुरू असतानाच काही राजकीय निरीक्षकांनी याबाबतीत शंका व्यक्त केल्या आहेत. आज जरी हा समझोता होताना दिसत असला तरी हे समझोत्याचे वातावरण किती दिवस टिकेल असा प्रश्‍न काही पत्रकार विचारत होते. या प्रश्‍नात तथ्य आहे. कारण उध्दव ठाकरे ही बैठक संपवून बाहेर पडले की त्यांचे कान फुंकणारे लोक असे काही कान फुंकणार आहेत की दिल्लीत झालेला सगळा समझोता विस्कटून जाणार आहे.

उध्दव ठाकरे हे अतीशय सभ्य आहेत. मात्र त्यांच्याकडे फार मोठी दूरदृष्टी नाही. ते लोकांच्या मताने चालतात असे दिसते. शिवसेनेमध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचा सातत्याने असा प्रयत्न असतो की शिवसेना आणि भाजपा यांच्यातली मैत्री सतत विस्कळीत राहिली पाहिजे. काही वेळा उध्दव ठाकरे भाजपाच्या जवळ यायचा प्रयत्न करतात तेव्हा अशा कारस्थानी लोकांच्या पोटात दुखायला लागते आणि ते लोक जाणीवपूर्वक अशी काही विधाने करतात की ज्यामुळे भाजपा आणि उध्दव ठाकरे यांच्यातले अंतर वाढावे. या दृष्टीने गेल्या काही दिवसातील अशा काही उपद्व्यापी नेत्यांची विधाने आपण तपासून पाहिली तर भाजपा-शिवसेना संबंध विस्कटणारे नेमके कोण आहेत हे आपल्याला लक्षात येईल. हे लोक रालो आघाडीच्या या बैठकीतील उध्दव ठाकरे यांची नरमाईची भूमिका बघून अस्वस्थ झालेले आहेत. बैठक संपली की ते कामाला लागणार आहेत.

Leave a Comment