गोवध बंदीबाबत काही प्रश्‍न


भारतात सध्या गोवध बंदीवर बरीच चर्चा चाललेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी देशभर गोवध बंदी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गोवध बंदी होण्याची फार गरज होती. परंतु आजवर ती झालेली नाही. ही स्वातंत्र्यानंतरची फार मोठी चूक आहे असे वातावरण निर्माण करण्याचा सरसंघचालकांपासून सामान्य स्वयंसेवकांपर्यंत सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु या प्रयत्नामागे किंवा आग्रहामागे जे तर्कशास्त्र सांगितले जाते ते तर्कशुध्द विचार करणार्‍या कोणालाही पटणारे नाही आणि गोवध बंदीचा आग्रह धरणार्‍या लोकांनीही फार मोठे शास्त्रीय आधार देऊन ते तर्कशास्त्र जनतेसमोर मांडलेले नाही. त्यामुळे गोवध बंदी समर्थनीय ठरत नाही. मात्र गोवध बंदीचा आग्रह धरणार्‍यांना कोणी काही प्रश्‍न विचारले आणि त्यांच्या तर्कशुध्द परिणतीपर्यंत चौकशी सुरूच केली तर या गो भक्तांचे त्यावर एक शेवटचे उत्तर असते ते म्हणजे हा आमच्या भावनेचा प्रश्‍न आहे. तेव्हा भावनेच्या प्रश्‍नाविषयी तर्कशास्त्राने चर्चा करण्याची काही गरज नाही. आमची भावना आहे म्हणून गोहत्या बंदी केली पाहिजे.

आता गाईच्या पालनामध्ये ज्यांच्या भावना गुंतल्या आहेत त्यांच्या भावनेचा आदर करण्यासाठी गाईंची कत्तल बंद करायची आहे पण त्या भावनेसाठी भाकड गाई सांभाळण्याची जबाबदारी मात्र गरीब शेतकर्‍यांवर येऊन पडलेली आहे. म्हणजे जे लोक कधी गाईंचा सांभाळ करणार नाहीत, शहरात राहून वसुबारसेदिवशी गाईची पूजा करून फोटो छापून आणणार आहेत आणि बसल्या बैठकीला गाईच्या हत्येला बंदी घालण्यामागच्या कथित अर्थशास्त्राची केवळ चर्चा करणार आहेत त्यांच्या अतार्किक भावनेसाठी शेतकरी मात्र स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अनुत्पादक गाई सांभाळत बसणार आहे. बरे या लोकांच्या भावनेचा प्रश्‍न आहे म्हणजे तरी काय? कोणत्या काळातली ही गाईच्या पूज्य भावनेची ही कल्पना आहे? याचा काहीही पत्ता लागत नाही. कोणीतरी उठून हा आमच्या भावनेचा प्रश्‍न आहे असे म्हणायचे आणि त्यापायी देशाची अर्थव्यवस्था पणाला लावून आपण गरीब शेतकर्‍यांची परवड करायची अशी काही भावना असू शकते का? गाईच्या पालनाशी आपली भावना जोडणारे हे लोक स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गाईची जोपासना करणार्‍या शेतकर्‍याची अवस्था हा आपल्या भावनेचा प्रश्‍न का करत नाहीत? माणसापेक्षा गाय प्रिय ही कुठली संस्कृती आणि हा कुठला धर्म?

गोहत्या बंदीची चर्चा निघाली की काही ठराविक सात-आठ युक्तिवाद केले जातात. गाईला आपण देवाचा आणि आईचा दर्जा देतो असे म्हटले जाते. परंतु काही गोभक्त एवढे पुढे गेलेले आहेत की ते आईपेक्षासुध्दा गाईला जास्त महत्त्व देतात. आपल्याला आपली आई प्रिय का असते कारण तिच्या दुधावर आपले पोषण झालेले असते. ते दूध अमृताहूनही श्रेष्ठ आहे. यात काही शंका नाही. परंतु गाईच्या बाबतीत आपले तसे नाही. गार्ईच्या दुधाबरोबरच शेण आणि मूत्र यांनासुध्दा आपण महत्त्व द्यायला लागलो आहोत. यामध्ये कसलेही शास्त्र नाही. अशावेळी काही प्रयोगशाळांचे हवाले देऊन गाईच्या मूत्रातील रासायनिक घटक, गाईच्या शेणातील काही औषधी गुणधर्म आणि तिच्या शेणामूताचा शेतीला होणारा उपयोग याचे काही निष्कर्ष आपल्या तोंडावर फेकले जातात. परंतु अशाच प्रकारचे अनेक गुणधर्म इतरही अनेक प्राण्यांच्या शेणामुतात असू शकतात. त्यांचे रासायनिक पृथःक्करण करून त्यांचे निष्कर्ष का मांडले जात नाहीत. तिथे आपण विज्ञानापेक्षा केवळ भावनेला अवाजवी महत्त्व देत असतो आणि आव मात्र प्रयोगातून सिध्द झालेल्या गोष्टी मानण्याचा आणलेला असतो.

गाईमध्येसुध्दा जर्सी गाय प्रिय नाही. कारण तिला वशिंड नाही. याही बाबतीत पुन्हा काही शास्त्रीय संशोधने आणि त्यांचे निष्कर्ष हे आपल्याला सांगितले जातात. देशी गाईच्या वशिंडामध्ये काही मौल्यवान एंझाईन्स असल्याचे सांगितले जाते. वादासाठी क्षणभर तसे गृहित धरले तरी या एंझाईन्सचा आपल्याला काय फायदा होतो हे कधीच सांगितले जात नाही. मात्र ही वशिंड्याची कहाणी मोठी बनावट आहे. वशिंड असलेल्या गाई जगभर पाळल्या जात नाहीत. भारत, पाकिस्तान, बांगला देश, टांझानिया आणि केनिया याच देशांमध्ये अशा गाई आहेत आणि हेच देश जगातले सर्वात दरिद्री देश आहेत. ज्या देशांनी वशिंड नसलेल्या गाई पाळलेल्या आहेत त्यांनी गाईला लागणारे खाद्य आणि तिच्या पासून मिळणारे दूध यांचा हिशोब घालून नफ्यातोट्याचा विचार करून या वशिंड नसलेल्या गाई सांभाळल्या आहेत. ते देश मात्र श्रीमंत आहेत आणि आपण मात्र लीटर ते दीड लीटर दूध देणार्‍या मात्र त्यापेक्षा अधिक पैशाचा चारा खाणार्‍या गाई त्यांच्या वशिंडासाठी पाळत बसलो आहोत. कसलेच अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, विज्ञान या गोष्टीला दुजोरा देत नाही. तेव्हा शेतकर्‍यांना तोट्यात घालणारी ही गोवध बंदी त्यांच्या मुळावर येणारी आहे. गाई सांभाळण्यातला तोटा ज्यांना कधी सहन करायचाच नाही त्यांच्या भावनेसाठी आपण पूर्ण शेतकरी वर्गाला उद्ध्वस्त करायला निघालो आहोत.

Leave a Comment