दरवर्षी या हनुमानाची वाढते उंची


बजरंगबली हनुमानाची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. हिंदू संस्कृतीत लक्षावधी देव आहेत. देशभरात कोणत्या देवाची मंदिरे सर्वाधिक आहेत असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर मात्र महाबली हनुमान असे आहे. मध्यप्रदेशातील सतना शहरापासून १५ किमी वर असलेल्या रामपूर वाघेला भागात रामवन हनुमान भाविकांबरोबरच पर्यटकांचेही मुख्य आकर्षण ठरले आहे.

या हनुमानाबद्दल असे सांगितले जाते की, हा हनुमान स्वयंभू आहे व त्याच्या मूर्तीची उंची दरवर्षी वाढते.रामवन हनुमान मंदिर असे या स्थानाचे नांव आहे. रामवन म्हटले की रामासंदर्भात काही असेल अशी कल्पना होणे साहजिक आहे पण हे स्थान रामभक्त हनुमानाचे स्थान आहे. या विशाल काय मूर्तीसंदंर्भात अनेक रोचक कथा सांगितल्या जातात. असे सांगतात की बनारस वरून आलेले व्यापारी शारदा प्रसाद येथे आले व येथेच त्यांनी गाड्यांच्या एजन्सीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर व्यवसाय यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी ६४ एकर जागा खरेदी केली. त्यात तुलसी स्तंभासाठी ३२ एकर व रामवन पर्यटनासाठी ३२ एकर अशी जागेची विभागणी केली.

या ठिकाणी ७२ वर्षांपूर्वी त्यांनी हनुमानाची मूर्ती स्थापन केली. ती दरवर्षी उंचीने वाढते. आता त्याची उंची इतकी आहे की शहराच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून ही मूर्ती दिसू शकते. अभयमुद्रेतील मूर्ती पूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना बजरंगबली मनापासून आशीर्वाद देतात व भाविकांच्या सार्‍या इच्छा पूर्ण करतात असे म्हणतात. भक्तांसाठी कल्याणकारी ठरलेल्या या हनुमानाचा उत्सव वसंत पंचमी पासून पाच दिवस साजरा केला जातो. तेव्हा येथे यात्रा भरते. येथील जिल्हा प्रशासनाकडूनही रामवन महोत्सव साजरा केला जातो.

Leave a Comment