स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर


मुंबई: गेल्या ४ महिन्यात स्वाईन फ्लूमुळे तब्बल ९७ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पूढे आली असून स्वाईन फ्लूमुळे केवळ एकट्या पूण्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा ३१वर असून, २३ जण व्हेंटीलेटरवर आहेत. हा आकडा वाढतच असल्यामुळे राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात स्वाईन फ्लुच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ६ जणांवर तर, खासगी रूग्णालयात २८ जणांवर उपचार सुरू आहेत. एकूणच काय तर, पुण्यात सध्या नोद असलेले स्वाईन फ्लूचे ३४ रूग्ण आहेत. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथे स्वाईन फ्लूमुळे ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, मागच्या तीन महिन्यात नाशिकमध्ये २३ जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याची माहिती आहे. २३ मृतांपैकी १८ जण खासगी रूग्णालयात तर, ५ शासकीय रूग्णालयात मृत्यू पावले.

सुरक्षेचा उपाय म्हणून कोणत्याही प्रकारचे दुखणे विशेषत: सर्दी, ताप, थंडी, डोकेदुखी, खोकला यांकडे दुर्लक्ष करू नये. तसेच, कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. असे करणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. थंडी वाजून येणे, १०० पेक्षा जास्त ताप येणे, घसा दुखणे किंवा खवखवणे, अंगदुखी किंवा पोटदुखी ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. यावर वेळीच उपचार घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी लस किंवा टॅमी फ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो. तसेच, योग्य उपचार घेतल्यास त्यावर इलाजही करता येतो. फक्त निष्काळजीपणाने कोणतेही दुखने अंगावर काढू नये. त्रास जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment