आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यात आली असून पीएफमधील पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला तारेवरची कसरत करण्याची गरज नाही. आता लवकरच तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यामधील पैसे काढू शकणार आहात. ईपीएफओकडून करण्यात येणा-या या सुविधेचा फायदा तब्बल ४ कोटी खातेधारकांना होणार आहे.
आता मोबाईल अॅपच्या माध्यमातून काढता येणार पीएफ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओ यासाठी मोबाईल अॅप ‘उमंग’च्या माध्यमातून क्लेम सेटल करण्याची तयारी करत आहे. सोमवारी लोकसभेत केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले की, ईपीएफओ पीएफ क्लेमचा अर्ज ऑनलाईन रिसिव्ह करण्यासाठी ऑनलाईन क्लेम सेटलमेंट प्रोसेसही डेव्हलप करण्यात येत आहे.
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटले की, न्यू एज गव्हर्नंससाठी अॅप्लिकेशनला युनायटेड मोबाईल अॅपशी जोडले जाणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून क्लेम सेटलमेंट सुरु करण्याची कोणताही टाइम फ्रेम फिक्स नाही. ईपीएफओला दरवर्षी १ कोटी अॅप्लिकेशन मिळतात ज्यामध्ये पीएफ काढणे, पेन्शन फिक्स करणे किंवा ग्रुप इन्शुरन्स बेनेफिट सेटलमेंट यांचा समावेश आहे. ही सर्व कामे मॅन्युअल पद्धतीने केली जातात.
याबाबत ईपीएफओच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, १२३ फिल्ड ऑफिसपैकी ११० ऑफिस हे पूर्वीपासूनच सेंट्रल सर्व्हरशी जोडले गेलेले आहेत. ऑनलाईन क्लेम सेटल करण्याची सुविधा सुरु करण्यापूर्वी सर्व फिल्ड ऑफिसेस सेंट्रल सर्व्हरशी जोडणे गरजेचे आहे.