शुक्रवारपासून भीम अॅपवरुन व्यवहार केल्यास ग्राहकांना फायदा


नवी दिल्ली – १४ एप्रिलला नागपुरात डिजिटल मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन नव्या योजनांची सुरुवात करण्याची शक्यता असून या नव्या योजनांनुसार सरकारी डिजिटल व्यवहार केल्यास किंवा डिजिटल व्यवहार करण्यासाठी इतरांना प्रेरित केल्यास सरकारकडून कॅशबॅक देण्यात येईल. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारकडून साधारणत: १५० ते २५० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक दिले जाणार आहे.

सरकारकडून सरकारी माध्यमातून म्हणजेच भीम अॅप, आधार अनबेल पेमेंट यंत्रणेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येईल. इतर खासगी कंपन्यांच्या अॅपवरुन किंवा बँकांच्या अॅपवरुन करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी सरकारकडून कॅशबॅक दिले जाणार नाही. दुसऱ्या योजनेनुसार, एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला सरकारच्या डिजिटल माध्यमांतून व्यवहार करण्यासाठी प्रेरित केल्यास ३० रुपयांचे अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकते. कॅशबॅकची रक्कम व्यवहारांच्या संख्येवर ठरणार आहे. लोकांनी अधिकाधिक डिजिटल व्यवहार करावेत, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळावे, यासाठी या योजना सुरु करण्यात येणार आहेत.