ऑनलाईन विक्रेते आघाडीवर


गृहोपयोगी वस्तूंचा घरगुती पुरवठा करणार्‍या कंपन्या ज्यांना व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एफएमसीजी म्हणजे फास्ट मूव्हींग कन्झुमर गुडस् असे म्हटले जाते. यांनी भारतात वेतन देण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी वार्षिक ११ लाख ३० हजार रुपये एवढे वेतन देऊन या कंपन्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. म्हणजे या क्षेत्रात उत्तम नोकर्‍याच्या संध्या आहेत आणि त्यांचे वेतनही आकर्षक आहे. हे लक्षात येते. वास्तविक पाहता आपल्या देशामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वेतनाच्या बाबतीत फारच गवगवा आहे आणि या क्षेत्रातले वेतनाचे आकडे ऐकले म्हणजे माहिती तंत्रज्ञान हेच क्षेत्र आघाडीवर असेल अशी आपली कल्पना होते. परंतु रॅन्डस्टॅड या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये असे आढळले आहे की वेतनाबाबत माहिती तंत्रज्ञान तिसर्‍या क्रमांकावर आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे सरासरी वार्षिक वेतन ९ लाख ३० हजार रुपये आहे. या संदर्भात दुसरा क्रमांक पटकावलेले ऊर्जा क्षेत्र आपल्या कर्मचार्‍यांना दरसाल सरासरी ९ लाख ८० हजार रुपये एवढे वेतन देते. भारतामध्ये औषध निर्मिती, वैद्यकीय उपचार या क्षेत्रानींही उत्तम पगार देणारी क्षेत्रे असा मान मिळवला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे वार्षिक सरासरी वेतन ८ लाख ८० हजार रुपये तर आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे सरासरी वार्षिक वेतन ८ लाख ७० हजार रुपये आहे. रॅन्डसॅन्ड इंडिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मूर्तीके उप्पलुरी यांनी हे आकडे सांगतानाच भारतातले या क्षेत्रातले कर्मचारी भराभर नोकर्‍या बदलतात अशी माहिती दिली. मात्र वारंवार कंपन्या बदलल्याने त्यांची प्रगती होत असली तरी आपली नोकरी सोडून कर्मचारी दुसरीकडे का जातात याचा विचार त्या कंपन्यांनी करण्याची वेळ आली आहे, असेही उप्पलुरी म्हणाले.

कंपन्यांच्या सोबतच प्रत्येक शहराचे एक वेतनमान असते आणि त्याचाही अभ्यास उप्पलुरी यांच्या संघटनेने केलेला आहे. त्यात त्यांना असे आढळले आहे की भारतात बंगळुरु हे सर्वात उत्तम पगार देणारे शहर आहे. बंगळुरुच्या कर्मचार्‍यांचे आणि कामगारांचे वार्षिक वेतनमान १४ लाख ६० हजार रुपये आहे. याबाबत मुंबईचा क्रमांक दुसरा असून मुंबईने पाहणीच्या वर्षामध्ये मुंबईत काम करणार्‍या कामगार कर्मचार्‍यांना सरासरी वर्षाला १४ लाख २० हजार रुपये वेतन दिलेले आहे. मात्र या दोन शहरामध्ये जाईल त्याला काम मिळते ही गोष्ट खरी आहे.