पंजाब हा मुळातच दिलदार प्रांत. येथे सरदारांच्या ढाब्यांवर मिळणारे पराठे, छोले, पनीरचे पदार्थ, लस्सी, तंदूर कोंबड्या मुळातच खव्वैंयाना वेड लावणार्या. त्यात सरदार त्याच्या रूंद छातीप्रमाणेच भरघोस प्रेमाने खव्वैयांना प्रेमात पाडणार. याच पंजाबमधील मरेल कोटला हे छोटेसे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वाचे गांव तेथील नबाबी खाण्यासाठीही चांगलेच प्रसिद्ध असून येथे एकबार नमक खाया, बारबार लौट आया अशी म्हण आहे. म्हणजे एकदा का येथील पदार्थ चाखलेत की तुम्ही परत परत येथे येणारच. पंजाबच्या विविध शहरांतून लोक येथे केवळ खाण्याच्या प्रेमापोटी येतात तसेच ते देशभरातूनही येतात.
एकदा चाखाल, तर परत परत याल
या गावात आजही नबाबी बावर्चींचे वंशज खवैयांना एकसो एक लजीज पदार्थांची चव चाखवत असतात. या गावाला मोठा इतिहासही आहे. अफगाणिस्तानचा बादशहा बहलोल लोदी १४५१ मध्ये भारताच्या अनेक भागात राज्य करत होता व त्याला दिल्ली काबीज करायची होती. त्यासाठी तो चालला असताना वाळूच्या वादळात सापडला. दूर अंतरावर त्याला दिवा दिसला तो होता शेख सदहद्दीनच्या झोपडीतील. बादशहाने या फकीराला नमस्कार करून दिल्ली स्वारीत यश द्यावे अशी प्रार्थना केली व दिल्ली मिळताच मलेर कोटलाची जहागीरी त्यांना दिली. १६५७ मध्ये औरंजजेबाला सिंहाच्या हल्ल्यातून वाचविल्याबद्दल बाईजीद खान याने मलेर कोटला ही दोन्ही गावे जोडून तेथे किल्ला बांधला व त्या गावचा नबाब झाला. १८०९ मध्ये या गावातही ब्रिटीश राज्य आले.
या गावात आजही हिंदू मुस्लीम एकदिलाने राहतात, गुरू गोविंद सिंग यांनी या गावाला सहाहरित राहण्याचे वरदान दिले आहे. मकई की रोटी, सरसोंका साग या खास पंजाबी पदार्थांबरोबरच येथे तंदूर कोंबडी, मटणाची अनेक पदार्थ, दही, मसाले घालून शिजविलेल्या खास पाककृती खवैय्यांच्याच नव्हे तर खाण्याची फारशी आवड नसलेल्यांच्या तोंडालाही पाणी आणतात. गरमागरम जिलेबीचा केशर व खजूर घालून उकळविलेल्या दुधाबरोबरचा आस्वाद तर जणू स्वर्गाची दारे खुली करणारा आहे. त्यामुळे कधीकाळी पंजाबात गेलात तर या गावाला जरूर भेट द्या.