स्त्री-पुरुषांना वेगळा पगार देण्याचा गुगलवर आरोप


इंटरनेटवर जवळपास एकाधिकार मिळविलेल्या गुगलवर वेतनामध्ये भेदभाव केल्याचा आरोप अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने केला आहे. गुगलमध्ये महिलांना कमी पगार मिळतो आणि कंपनीत पगाराच्या बाबतीत सुव्यवस्थित फरक केला जातो, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

शुक्रवारी या संदर्भातील एका खटल्याची सुनावणी सान फ्रान्सिस्को येथील न्यायालयात झाली. त्यावेळी ही माहिती पुढे आली. मंत्रालयाच्या वतीने संचालक जॅनेट विप्पर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले, की त्यांच्या संस्थेने या संदर्भात चौकशी केली आहे. त्यात संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाच्या बाबतीत फरक केल्याचे दिसून आले.

अमेरिकेतील समान संधी कायद्यानुसार वेतनाच्या संदर्भातील माहिती गुगलने देणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती दिलेली नसल्यामुळे मंत्रालयाने हा खटला दाखल केला आहे.

गुगलने या आरोपाचा स्पष्ट इंकार केला आहे. “दर वर्षी महिला व पुरुषांच्या पगाराची आम्ही संपूर्ण समीक्षा करतो आणि आम्हाला कुठलाही लैंगिक फरक आढळलेला नाही,” असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गंमत म्हणजे याच आठवड्यात गुगलने इक्वल पे डे (समान वेतन दिवस) साजरा केला होता. स्त्री-पुरुषांमधील भेद मिटविणाऱ्या कंपन्यांचे आपण नेतृत्व करत असल्याचे दाखवण्याचा गुगलचा प्रयत्न होता.

Leave a Comment