वित्त वर्षाची सुरवात १ जानेवारीपासून शक्य


सध्या ब्रिटीश परंपरेनुसार आर्थिक वर्षाची १ एप्रिलपासून होत असलेली सुरवात बदलून ती १ जानेवारीपासून करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालाची केंद्र सरकारकडून तपासणी सुरू असल्याचे लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा करण्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी त्यावर विस्तृत चर्चा केली जाईल व मगच अंतिम निर्णय घेतला जाईल.

नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून करणे हा केंद्र, राज्य सरकारे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिताचा प्रश्न आहे. आपली सध्याची आर्थिक प्रणाली ही ब्रिटीश सरकारने ठरविलेल्या प्रणालीवर आधारित आहे. जगात अनेक देशांत आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून मोजले जाते तर काही देशांत ते जूनपासूनही मोजले जाते. हा काळ प्रत्येक देशाच्या स्थानिक गरजांवर ठरतो. मात्र यावर्षी अर्थंसंकल्प १ फेब्रवारीला सादर करून आपणही सुधारणेचे पहिले पाऊल टाकले आहे. यामुळे अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या अनेक योजना, विभिन्न मंत्रालये, राज्यांना हा पैसा वर्षाच्या सुरवातीलाच हाती मिळाला आहे व त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. त्या दृष्टीनेही १ जानेवारीपासूनच आर्थिक वर्षाची सुरवात करण्याकडे पाहिले जात आहे.

Leave a Comment