भोपाळमधील टॅक्सपेअर कर्फ्यू देवी


सध्या देशात चैत्री नवरात्राची धूम सुरू आहे. त्यामुळे देवीच्या मंदिरांतून भाविकांची अलोट गर्दी होते आहे. भोपाळ मधील एक देवी मंदिर त्याच्या नावामुळे जसे खास आहे तसेच येथे ५० रूपयांच्या वर दान द्यायचे असेल तर ते रोखीने घेतले जात नाही म्हणूनही प्रसिद्ध आहे.५० रूपयांच्या वरचे दान देण्यासाठी येथे चेक द्यावा लागतो. माँ भवानी मंदिर असे नांव असलेले हे मंदिर प्रत्यक्षात कर्फ्यू माता मंदिर नावाने अधिक प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे येथील कर्फ्यू माता टॅक्सपेअर आहे. मंदिर समितीने या मातेच्या नावाने गतवर्षी अडीच लाख रूपये आयकर भरला आहे. अशा प्रकारचे आयकर भरणारी ही बहुदा पहिलीच देवी आहे.

हे मंदिर फार जुने नाही. १९८२ साली त्याचे बंाधकाम केले गेले. मात्र त्यावेळी भोपाळ मध्ये धार्मिक तणाव होते त्यामुळे प्रशासनाने मंदिरातील मूर्ती रातोरात हलवून शीतलदास बगिच्यामध्ये नेली. मात्र भाविकांचा या प्रकारे मूर्ती हलविण्यास विरोध होता. वातावरणातील तणाव लक्षात घेता प्रशासनाने येथे १ महिना संचारबंदी लागू केली. त्यामुळे या मंदिराचे नाव कर्फ्यू माता मंदिर असे झाले. भाविकांचा जोर पाहून अखेर प्रशासनाने माघार घेतली व स्वर्णकळसासह देवीची मूती पुन्हा मंदिरात स्थापन केली. आजही शेकडो भाविक या मंदिरात नित्यनेमाने दर्शनाला येतात.

मंदिरातील मातेची मूर्ती ३ फुटी असून संगमरवरी आहे. मंदिरावर साडेतीन किलो सोन्याचा कळस आहे. देवीच्या मखरावर १५० किलो चांदी आहे. नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतोच पण शिवरात्रीला बडवाले महादेव मंदिरातून शिवाची वरात या मंदिरात येते व येथे माता भवानी व शिव यांचा विवाहसोहळाही साजरा केला जातो.

Leave a Comment