नवी दिल्ली: आणखी एक महत्वपूर्ण निर्णय बँकांनी घेतला असून या नियमाची पूर्तता न केल्यास बँक अकाऊंट धारकांना मोठा फटका बसणार आहे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी आता पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही तुमच्या बँकेत पॅन नंबर दिला नसेल तर तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते. ३० जूनपर्यंत आपला पॅन नंबर जमा करण्याची सूचना बँकांनी आपल्या खातेदारांना दिली आहे. आता जर तुम्ही ३० जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास तुमचे बँक खाते बँकेकडून गोठवण्यात येईल.
३० जूनपर्यंत बँकेत द्या तुमचा पॅन नंबर
हा निर्णय घेण्यात आल्यानंतर बँक खाती पँनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत आता वाढ करून ३० जूनपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही, अशांनी फॉर्म-60 जमा करावा, असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.
बँकांनी यासंदर्भात आपल्या ग्राहकांना पत्र पाठवून पॅनकार्ड क्रमांक किंवा फॉर्म ६०अ जवळच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. या पत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात बँक खातेदारांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते. जर तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट बंद होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला पॅन नंबर बँकेत देणे अतिशय गरजेचे झाले आहे. त्यामुळे तुमच्या बिझी शेड्युलमधून जरा वेळ काढून तुमच्या बँकेत जात आणि तुमचा पॅन नंबर द्या.