मनाच्या तळाशी


आज सार्‍या जगात जागतिक आरोग्य दिन पाळला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना असे दिवस पाळते तेव्हा प्रत्येक दिवसाच्या अशा दिवसाची थिम ठरलेली असते आणि त्या त्या वर्षात जगात आढळलेल्या विविध समस्यांचा विचार करून ही थिम ठरवली जाते. या वर्षी मानसिक घुसमट हा विषय घेतला असून, जगभरात या विषयात लोकांना सुजाण करण्यासाठी चला बोलू या असा संदेश दिलेला आहे. जगाच्या म्हणजेच मानवतेच्या इतिहासात नवनवे प्रयोग यशस्वी होऊन काही रोगांचे उच्चाटण होत आहे पण असे होतानाच मनाला होणारे विकार वाढत चालले आहेत. मानवतेच्या इतिहासातली ही विसंगती या संदेशाने अधोरेखित केली आहे. साथीच्या अनेक रोगांना हटवणारा हा माणूस प्राणी मानसिक रोगांपुढे हतबल झाला आहे या मागचे कारण काय असा सवाल या संदेशाने उपस्थित केला आहे. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक मानव प्राण्याला आपल्याच मनाच्या तळाशी जाण्याची प्रेरणा दिली आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने या निमित्ताने मानसिक विकारांनी ग्रस्त असणार्‍या रुग्णांची संख्या आणि त्यांत सदोदित होत असलेली वाढ यांचे मोठे विदारक चित्र उभे केले आहे. सारे जगच या विकारांनी त्रस्त आहे. २००५ सालपासून अशा मानसिक विकारांनी त्रस्त असणारांंचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. सतत वाढत असलेले शहरीकरण हे त्याचे कारण आहे. शहरातली धावपळ, स्पर्धा, श्रीमंत होण्याची चढाओढ, व्यसने आणि व्यायामाचा अभाव याच्यासोबतच बदलती जीवनपद्धती यांचा परिणाम लोकांवर झाला आहे. शिवाय बैठी कामे, अपुरी झोप, जीवनाविषयी असलेली अनिश्‍चितता यांचाही या जीवनात प्रभाव आहे आणि त्यामुळे भौतिक सुखाची रेलचेल अनुभवणारा हा प्राणी आता मानसिकदृष्ट्या दरिद्री झाला आहे. सार्‍या जगातच हे प्रमाण वाढत असून त्यातून अनेक गुंतागुंंतीचे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. आत्महत्यांचे वाढते प्रमाण हा त्याचाच परिणाम आहे. जगात आता दरसाल ७८ लाखावर लोक आत्महत्या करतात. हे प्रमाण दररोज आणि प्रत्येक तासाला किती असे मोजले तर असे म्हणता येते की जगात दर दोन तासाला तीन लोक आत्महत्या करतात. आपले जीवन आनंदमय करण्याची प्रत्येकाची मनिषा असते पण, ते शक्य झाले नाही की तो निराश हाेतो. जीवनातला आनंद हा श्रीमंतीत आहे अशी लोकांची भावना असते. आनंदाची कल्पना नीट न कळल्याने ते आनंद प्राप्त करू शकत नाहीत आणि आत्महत्या करून मोकळे होतात.

मानसिक विकारांंच्या बाबतीत एक गोष्ट चटकन लक्षात येते की आपल्या आसपास मनोविकारांनी त्रस्त असलेले अनेक लोक असतात. भारतात तर दर २० लोकांमागे एकजण अशा विकारांचा बळी आहे पण अशा लोकांना कोणी आजारी मानत नाही कारण मानसिक विकारांना आपण आजार म्हणून मान्यता देत नाही. म्हणूनच आपली झोप उडवणारे एक सत्य असे आहे की भारतातल्या दर चार ते पाच तरुणांमागे एकजण डिप्रेशनच्या आजाराने त्रस्त आहे पण अजून आपण ही बाब म्हणावी तशी गांभीर्याने घेतलेली नाही आणि या तरुणांना बाहेर काढण्यासाठी आपण पावले उचललेली नाहीत. तशी ती उचलायची असतील तर त्यासाठी आधी मानसिक आजार हा शारीरिक आजारासारखाच आजार आहे हे मान्य करावे लागेल. भारतात तर ही स्थिती सर्वात वाईट आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतातल्या या स्थितीवर विशेष लक्ष केन्द्रित करण्याची सूचना केली आहे. भारतात मधूमेहाचे प्रमाण जास्त आहे. हृदयविकारांचेही प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. रस्त्यांवरच्या अपघाताबाबतही भारताचा जगात पहिला क्रमांक आहे.

आता जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक विकारांतही भारत आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. भारतात मानसिक विकारांबाबत फारच अज्ञान आहे. मुळात आपल्या देशातले ५० टक्के लोक शारीरिक आजारांनाही डॉक्टरांचे उपाय घेत नाहीत. ते लोक आजारांवर अंगारे, धुपारे, ताईत यांचाच उपचार करत असतात. मानसिक आजारावर मानसोपचार करणारांकडे कोठून जाणार ? मानसिक आजार मनाचा असला तरीही त्याची लक्षणे ही डोके दुखणे, झोप उडणे, चक्कर येणे असे शारीरिक असतात. त्यामुळे प्रथम या लक्षणांवर उपचार केले जातात. या लक्षणांचे मूळ मनात असल्याने या वरच्या उपचाराने लक्षणे काही वेळ दबतात पण पुन्हा पुन्हा उद्भवतात. अशा वेळी हे वरचे उपचार करून थकलेले रुग्णाचे नातेवाईक ही काही तरी दैवी बाधा झाली आहे अशा निष्कर्षाप्रत येतात आणि तिथून सुरू होते अंध:श्रद्धांची यात्रा. हा आजार औषधांनी बरा होणारा नाही तर तो देवाला जाण्याने, भुताला नैवेद्य दाखवल्याने, जप केल्याने, वार्‍या केल्यानेच बरा होणारा आहे असे मानले जाते आणि या उपायांनी रुग्णाची अनेक प्रकारे लूट होते. तीर्थश्रेत्रात गर्दी होते. भूत बाधा काढणारे मांत्रिक त्यांच्याकडून पैसे लुबाडतात. महाराज, बुवा, साधू यांची दुकाने याच अंध:श्रद्धांवर चालत असतात. एकंदरीत शारीरिक आजार बरा होत नसेल तर मानसोपचार करणारां कडे जावे एवढी गोष्ट केली तरीही हे सारे वेडाचार संपतील.