टीव्हीएसने आणत आहे लाख मोलाची अपाचे RTR ३१० बाईक


नवी दिल्ली – या वर्षी जुलै महिन्यात बाईक प्रेमींमध्ये चर्चेत असलेली आणि बहुप्रतिक्षित टीव्हीएस RTR ३१० लाँच होत आहे. ही बाईक नेमकी कोणत्या तारखेला लाँच होईल हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी कंपनी जुलै महिन्यातच ही स्पोर्ट्स बाईक बाजारात आणणार असल्याचे समजते.

पहिल्यांदा २०१६ च्या ऑटो एक्स्पोमध्ये अकुला बाईकच्या संकल्पनेवर निर्माण करण्यात आलेली अपाचे RTR ३१० बाईक सादर करण्यात आली होती. लवकरच दाखल होणाऱ्या BMW G ३१० R बाईकसारखेच इंजिन या बाईकमध्ये देण्यात आले आहे. BMW G ३१० R बाईकची निर्मिती बीएमडब्ल्यू आणि टीव्हीएसने एकत्रितपणे केली आहे. काही त्रुटींमुळे बीएमडब्ल्यूला आपल्या बाईकची लाँचिंग डेट टाळावी लागली. परंतु आता टीव्हीएस स्थानिक बाजारात ३१० सीसी इंजिनवाली बाईक पहिल्यांदा लाँच करणार आहे.

१.६ ते १.७ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपये अपाचे RTR ३१० ची किंमत इतकी असेल, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येते. कार्बन फायबर बॉडी हे या बाईकचे खास वैशिष्ट्य असणार आहे. त्याचबरोबर कॉम्पॅक्ट फ्रेम, स्प्लिट सीट, क्लिप-ऑन हॅण्डलबार्स, हाय परफॉर्मन्स टायर्स, पेटल डिस्क, ड्युअल चॅनल एबीएस आणि अन्य बऱ्याच वैशिष्ट्याने ही बाईक सज्ज असेल. बाईकमध्ये सिंगल सिलिंण्डर, लिक्विड कूल, फोर स्ट्रोक ३१३ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक ३४ bhp आणि २८ Nm टॉर्क जनरेट करेल.

टीव्हीएस अपाचे RTR ३१० बाईकचा लाँचिंगनंतर सामना बाजारात उपलब्ध असलेल्या KTM RC 390, Kawasaki Ninja 300 आणि लवकरच येऊ घातलेल्या Benelli 302R शी असेल. या बाईक्सच्या किमतींविषयी बोलायचं झाल्यास केटीएम आणि अपाचे या बाईक ग्राहकांसाठी जास्त किफायतशीर असतील. टीव्हीएस अपाचे आरटीआर बाजारातील सर्वात स्वस्त एण्ट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक ठरणार आहे.

Leave a Comment