स्नॅपडीलवर ताबा मिळवण्यासाठी फ्लिपकार्टचे प्रयत्न


मुंबई: फ्लिपकार्टने सततच्या तोट्याने ई-कॉमर्समध्ये चाचपडणाऱ्या स्नॅपडीलवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्नॅपडीलमधील सर्वांत मोठा गुंतवणूकदार असलेल्या सॉफ्टबॅंक आणि फ्लिपकार्टमध्ये महिनाभरात स्नॅपडीलचा सौदा पक्‍का होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या संभाव्य अधिग्रहणानंतर ई-कॉमर्समधील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील तिसरी मोठी ई-कॉमर्स कंपनी अशी ओळख असलेली स्नॅपडील तोट्यात आहे. वेतनवाढ रोखण्याबरोबर कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबून कंपनीने काटकसरीचे प्रयत्न केले होते; मात्र आता थेट कंपनीची विक्री करण्याची मानसिकता स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे स्नॅपडीलच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. फिल्पकार्टमध्ये विलीन झाल्यास स्नॅपडीलच्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, सॉफ्टबॅंकेने याबाबत फिल्पकार्टशी बैठक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्नॅपडीलच्या विक्रीबाबत कल्लारी कॅपिटल आणि नेक्‍सस व्हेंचर यांनी आक्षेप घेतला होता; मात्र त्यांचाही हिस्सा खरेदी करण्याची तयारी सॉफ्टबॅंकेने दर्शवली आहे. त्यामुळे स्नॅपडीलची विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment