विक्रमशीला – भारताचा दिमाखदार सांस्कृतिक वारसा


भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बिहारमधील प्राचीन विक्रमशील महाविहाराला नुकतीच भेट दिली. राजकीय विश्वविद्यालय अशी ओळख असलेले हे विद्यापीठ आता उध्वस्त अवस्थेत असले तरी भारताच्या दिमाखदार सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यास पुरेसे आहे. आजही देशातून तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देण्यासाठी येतात कारण त्यांच्यासाठी हा कुतुहलाचा विषय आहे. आज येथे या विद्यालयाचे भग्नावशेष आहेत मात्र त्यातूनही या विद्यापीठाची भव्यता काय असेल याचे अंदाज सहज बांधता येतात.

बिहारची रेशीमनगरी अशी ओळख असलेल्या भागलपूर पासून ५० किमी असलेल्या या विद्यापीठाची स्थापना पालवंशिय राजा धर्मपाल याने केली हेाती. ८ व्या शतकाच्या अखेरी अथवा ९ व्या शतकाच्या सुरवातीला हे विद्यापीठ स्थापले गेले असावे व धर्मपाल राजाला मिळालेल्या विक्रमशील पदवीवरूनच विद्यापीठाचे नांव विक्रमशीला ठेवले गेले असावे असे सांगितले जाते. चारशे वर्षे चांगले नांदतेगाजते असलेले हे शैक्षणिक संकुल १३ व्या शतकात नष्ट झाले. १०० एकराहून अधिक परिसरात पसरलेल्या या विद्यापीठाचे उत्खनन १९६० च्या दशकात सुरू केले ते पाटणा विश्वविद्यालयाने. १९७२-८२ या काळात ते भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आले.


असे सांगतात की त्या काळीही येथे १ हजार विद्यार्थी व १०० शिक्षक मुक्कामास होते. अध्यात्म, तंत्रविद्या, व्याकरण, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र या सारखे विषय येथे शिकविले जात. प्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचे काम येथूनच चालविले जात असे व दोन्ही विद्यापीठातील शिक्षक दोन्हीकडे शिकवित असत. केंद्र सरकारने आता या विश्वविद्यालयाच्या नावाने भागलपूर येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.

Leave a Comment