गायकवाड प्रकरण संपले


आपल्या संसदेतल्या खासदारांची संख्या ५५२ असली तरी त्यातले किती खासदार सदनात बोलतात आणि निरनिराळया चचार्र्ंत सहभागी होतात याचा शोध घेतला तर हाती काहीच लागत नाही. म्हणूनच एका ज्येष्ठ पत्रकाराने अशा खासदारांना मौनी खासदार अशी पदवी बहाल केली होतंी. तसे शिवसेनेचे खासदार प्रा. रवि गायकवाड हे बर्‍यापैकी मौनी खासदार असल्यामुळे खासदार म्हणून कोणाच्या खिजगिणतीत नव्हते पण विमानातल्या पराक्रमाने त्यांचे नाव रात्रीतून सर्वांना कळले. त्यांच्या बाबतीत घडलेला विमानातला किस्सा आता सर्वांना कळला आहे आणि त्यावर आता पडदा पडला आहे हेही सर्वांना माहीत झाले आहे कारण पडदा पडण्यापूर्वी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत शिवसेना स्टाईल दंगा घातला होता.

आता हे प्रकरण संपले आहे याचा अर्थ पूर्णच संपले आहे असा होत नाही. या प्रकरणातला रवि गायकवाड यांच्यावरच्या विमान प्रवासाच्या बंदीचे प्रकरण संपले आहे. त्यांनी विमानात जो काही प्रकार केला आणि त्यांच्याबाबतीत जे काही घडले त्या संबंधात पोलिसात तक्रारी दाखल झालेल्याच आहेत. त्या तक्रारींचे काय झाले आणि काय होणार आहे हे काही अजून कळलेले नाही. त्या संबधात काही चर्चा झालेली नाही. विमान प्रवासावर बंदी आल्यामुळे खासदार गायकवाड हे त्रस्त झाले होते. त्याच्याच बातम्या दररोज वाचायला मिळत होत्या. त्यातून त्यांची सुटका झाली आहे. मात्र त्यांनी या प्रकरणात मोडेन पण वाकणार नाही अशी जी भूमिका घेतली होती ती त्यांना सोडावी लागली आहे. त्यांनी एअर इंडियाला सॉरी म्हणायला पाहिजे होते पण त्यांनी हवाई वाहतूक मंत्र्यांना सॉरी म्हटले आणि त्यांची या त्रासातून सुटका झाली.

या प्रकरणातून आपला नेहमीचाच धडा आपणा सर्व मराठी लोकांना घ्यायला हवा. मराठी माणसाकडे संवाद कौशल्याचा अभाव असतो. तो पटकन रागाला येतो आणि क्षणात त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. रागाच्या भरात अनेक मराठी माणसांची स्वत:चे पूर्ण आयुष्याचे वाटोळे करून घेतले आहे. आपल्या हातून रागाच्या भरात काही घडले तर लगेच सॉरी म्हणून प्रकरण संपवणेही त्याला जमत नाही. पण वेळीच सॉरी म्हणायला शिकलो तर आपल्या जीवनातले निम्मे प्रश्‍न सुटतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आता झाले गेले यमुनेला मिळाले. यापुढे तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रांजळपणा म्हणजे दुबळेपणा नाही. कोणाला सॉरी म्हटल्याने आपण लहान होत नाही.

Leave a Comment