गायाळ भारतीय तालीबान


गाय हा देव आहे आणि हिंदू धर्मात तिला आईचा दर्जा देण्यात आला आहे. आता आता भारताच्या काही राज्यांत भाजपाची सरकारे सत्तेवर आली असल्याने गायीला पवित्र वगैरे मानणार्‍या आंधळ्या गायभक्तांना (गायाळांना) चेव आला आहे. या सरकारांनी गोवधबंदीचे कायदे करून आपल्या गोप्रेमाचे दर्शन मांडले असल्याने या गायाळांनाही आता सरकार आपल्याच बाजूचे असल्यागत वाटायला लागले आहे. गाय ही देवताच असल्याने तिची हत्या किंवा तस्करी करणारांना शासन करण्याचा आपल्यालाच अधिकार मिळाला आहे असे या लोकांचा भ्रम झाला असून त्यांनी आपले कामधंदे सोडून पोलिसांपेक्षाही तत्परतेने गायींच्या तस्करीवर आणि हत्यांवर नजर ठेवायला सुरूवात केली आहे.

अशाच काही अतिउत्साही गोभक्तांनी राजस्थानात अलवर येथे गायीची चोरटी वाहतूक करणार्‍या एका व्यापार्‍याला मरेस्तोवर मारले आणि आपले अतिरेकी गोप्रेम अशा अवैध मार्गांनी प्रकट केले. असेच प्रकार दादरी आणि गुजरातेतील उना येथेही घडले होते. आता या प्रकारांची पुन्हा आठवण काढली जात असून सरकारने अशा गायाळांना आवरावे असे आवाहन करण्यात येत आहे. आपण गोभक्त आणि सरकारही गोभक्त त्यामुळे गायींच्या संदर्भात काही ग्ाुन्हा करणारांना शिक्षा करण्याचा आपल्याला हक्कच आहे अशी काही तरी तालिबानी वाणाची कल्पना या लोकांच्या मनात आहे. सरकारने अशा लोकांवर जरब बसवली पाहिजे पण उलट राजस्थानच्या गृहमंत्र्यांनी त्यांचे समर्थनच केले आहे.

कोठे गायीची हत्या होत असेल, चोरटी वाहतूक होत असेल तर तो प्रकार पोलिसांच्या लक्षात आणून देणे हे या लोकांचे काम आहे. गुन्हा नोंदवून पुढची कारवाई करण्याचे काम पोलिसांचे आहे पण या गायाळांनी हीही जबाबदारी आपल्याच हातात घेतली असून लोकांवर दहशत बसवायला सुरूवात केली आहे. खरे तर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनीही अशा लोकांविषयी नापसंती व्यक्त केली होती. आता राजस्थानातल्या एका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून त्याची सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला गो रक्षा विषयक संघटनांवर बंदी का घातली जाऊ नये अशी विचारणा केली आहे. या लोकांचे उपद्व्याप हा काही हिंदुत्ववाद नाही. तसे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संघटनेबाबत खुलासा करायला हवा आणि या कारवाया संघ परिवाराच्या नाहीत असे स्पष्ट केले पाहिजे.

Leave a Comment