धुम्रपानामुळे होतात जगातील ११% टक्के मृत्यू


नवी दिल्ली – सिगारेटच्या पाकिटावरच काय पण वारंवार करण्यात येणा-या जाहिरातींमधूनही ‘धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे’ ओरडून ओरडून सांगितले जाते, पण याकडे लक्ष देत आहे कोण? आरोग्यास धुम्रपान करणे कितीही हानिकारक असेल आणि त्यामुळे कितीही गंभीर आजार होत असले तरी धुम्रपान करणा-यांची संख्या काही कमी होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धुम्रपानामुळे ११ टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहे आणि त्यातले ५०% लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातील होते. या चार देशांमध्ये धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. धुम्रपान करणा-यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू चीनमध्ये झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहे.

आरोग्याच्या समस्येमुळे २०१५ मध्ये ६४ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात ११% मृत्यू हे केवळ धुम्रपानामुळे झाले होते. मेडिकल जर्नल ऑफ ल्रन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात धुम्रपान करणा-यांची संख्या अधिक आहे. जगातील एकूण धुम्रपान करणा-यांपैकी दुर्दैवाने ११ % स्मोकर्स हे भारतात आहेत. त्यातूनही पुरूषांची संख्या ही अधिक आहे. दिवसेंदिवस धुम्रपानाची समस्याही गंभीर बनत चालली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात धुम्रपानाविषयी जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थावरही वैधानिक इशारा देणे बंधनकारक आहे.

जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत असा एक देश आहे जिथे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी नियमावली आहे. तरीदेखील भारतात धुम्रपान करणा-यांची आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. या यादीत भारताचे स्थान दुस-या क्रमांकावर असणे ही मोठ्या धोक्याची सुचना आहे. अनेक तरूण बदलती जीवनशैली, ताण तणाव यातून सुटका करण्यासाठी धुम्रपानाच्या आहारी जात आहे. जगातील दर चार व्यक्तींपैकी १ व्यक्ती ही नियमित धुम्रपान करते. धुम्रपानामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशातच भारताचे नाव या यादीत दुस-या क्रमांकावर असणे हा गांभीर्याचा विषय आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment