बांगलादेशात तरुणांच्या भल्यासाठी दररोज मध्यरात्री फेसबुकबंदी!


विद्यार्थी व युवकांचे भले व्हावे, यासाठी दररोज मध्यरात्रीपासून सहा तास फेसबुकवर बंदी आणण्याचा विचार बांगलादेश सरकार करत आहे.

या संदर्भात कॅबिनेट समितीने दूरसंचार मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. फेसबुकमुळे विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे आणि युवकांची काम करण्याची क्षमता कमी होत आहे, असे या पत्रात म्हटले आहे, असे डेली स्टार या वृत्तपत्राने म्हटले आहे.

दूरसंचार खात्याचे सचिव श्यामसुंदर सिकदर यांनी असे पत्र मिळाल्याचे मान्य केले आहे. दूरसंचार खात्याने बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगाकडून यावर मत मागविले आहे. याच्यामुळे व्यावसायिक दूरसंचारावर काही परिणाम होतो का, हे आपल्याला पाहावे लागेल, असे ते म्हणाले.

आयोगाने मत दिल्यानंतर सरकार अंतिम निर्णय करेल.

Leave a Comment