चला सौदीला, अनोख्या सौंदर्य स्पर्धेचा आनंद लुटायला


हजारो प्रेक्षक व जज यांच्या उपस्थितीत सौंदर्य स्पर्धा पाहायची मजा लुटायची असेल तर सौदीचे विमान तिकीट आच बुक करायला हवे. कारण या स्पर्धला येणार्‍यांसाठी केवळ १० हजार व्हिसा दिले जाणार आहेत. या सौंदर्यस्पर्धेतील सर्वात सुंदर ठरणार्‍या सुंदरीला २०६ कोटी रूपयांचे इनाम दिले जाणार आहे. अर्थात अनाघ्रत म्हणजे कुणीही न हाताळलेले सौंदर्य हे त्यासाठी खास मानक असून खाडी देशातून अनेक मॉडेल्स या सौंदर्यस्पर्धेसाठी दाखल होऊ लागली आहेत.

१२ मैलाच्या परिसरात त्यासाठी जागा सजविली गेली असून अनेक सुंदर तंबू उभारले गेले आहेत. किंग अब्दुल्ला कॅमेल फेस्टीव्हल अंतर्गत होत असलेल्या या सौंदर्यस्पर्धेतील सुंदरी म्हणजे उंट आहेत. या स्पर्धेत ५ हजार उंटांनी भाग घेतला असून ती १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. १९९९ मध्ये सुरवात झालेल्या या स्पर्धेत सुरवातीला स्थानिक होते मात्र नंतर सौदीचा शाही परिवाराचा पाठींबा त्यांना मिळाला व आता तो मोठा सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो.


यंदाच्या स्पर्धेत खाडी देशातून १३९० उंटमालक आले आहेत. येथे उंटांची खरेदीविक्रीही होते. पांढरे, काळे व मातकट रंगाचे उंट या स्पर्धेसाठी आले आहेत. यात उंटांच्या शरीराचे विविध अंगांनी परिक्षण केले जाते. त्याच्या डोक्याचा आकार, मानेची लांबी, गोलाई, दात ओठांखाली झाकले जातात का, मानेवरचे कुबड, ऊंटांची उंची, डोळ्यांचा आकार, कान, नाक यांचीही परिक्षा केली जाते. विशेष म्हणजे ही स्पर्धा फक्त वयस्क उंटांसाठी असून त्यात उंटाचे सौंदर्य नैसर्गिक आहे व त्याचे सांगितलेले वय खरे आहे अशी शपथ उंटमालकांना घ्यावी लागते असेही समजते.
——–

Leave a Comment