पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर सर्वांनीच डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपने हेच लक्षात घेऊन भारतात डिजिटल पेमेंट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आतापर्यंत पेटीएम, भीम अॅप सारख्या अॅप्लिकेशनचा वापर करुन व्यवहार केले असतील मात्र, आता तुमच्या आमच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असणा-या व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल पेमेंट करता येणार आहे.
डिजिटल पेमेंट क्षेत्रात आता व्हॉट्सअॅपची उडी
सध्या डिजिटल व्यवहाराला सर्वसामान्य नागरिकांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण प्राधान्य देत आहेत त्यामुळेच व्हॉट्सअॅपने डिजिडल पेमेंटचे फिचर आपल्या अॅपमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातच नाही तर जगभरात व्हॉट्सअॅप यूझर्सची संख्या अब्जाहूनही अधिक असल्यामुळे वीचॅट कंपनीने चीनमध्ये ज्या प्रकारे डिजिटल पेमेंटची सुरुवात केली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपकडून भारतात डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये व्हॉट्सअॅपकडून पर्सन टू पर्सन (पी टू पी) पेमेंट ही सेवा सुरु केली जाणार असल्याचे वृत्त द केन या वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.
भारतात येत्या सहा महिन्यांमध्ये व्हॉट्सअॅप ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु करणार आहे. ही योजना सुरु करण्यासाठी व्हॉट्सअॅपने UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)ची निवड केली असून याद्वारे व्हॉट्सअॅप पेमेंट सर्विस सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.
व्हॉट्सअॅप डिजिटल इंडियाला हातभार लावण्यासाठी काही कंपन्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात कशा पद्धतीने काम केले जाऊ शकते, यावर आमचा विचार सुरु आहे. यासाठी काही कंपन्यांसोबत बातचीत सुरु आहे.