सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन ‘गॅलक्सी जे३ प्रो’ भारतात लॉन्च


मुंबई – आपला बजेट स्मार्टफोन गॅलक्सी जे३ प्रो दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने भारतात लॉन्च केला असून हा फोन गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री केवळ पेटीएमवर सुरू आहे. सॅमसंग कंपनीकडून एखाद्या फोनची ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटवर विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षीच हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सॅमसंग जे सिरीजच्या अन्य फोनप्रमाणे या फोनच्या फ्रेमलाही मेटल फिनिशींग देण्यात आली आहे. तसेच अन्य गॅलक्सी स्मार्टपोनप्रमाणे यामध्येही होम बटन देण्यात आले आहे.

या फोनमध्ये ५ इंच एचडी ७२०×१२८० पिक्सल सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच १.२ गीगाहर्त्झ क्वॉड-कोर प्रोसेसर आणि २ जीबी रॅमसह हा फोन उपलब्ध आहे. या फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी असून १२८ जीबीपर्यंत मेमरी ती वाढवता येऊ शकते. ड्यूल सिम सपोर्ट असलेला हा फोन अॅन्ड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर आधारित आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, ४जी, जीपीआरएस, ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि मायक्रो यूएसबी हे फीचर देण्यात आलेत. याशिवाय यामध्ये २६०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन असल्याने याची किंमत ८४९० रुपये इतकी आहे.

Leave a Comment